Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Solapur › भीमा-कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ भाळवणीत कडकडीत बंद

भीमा-कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ भाळवणीत कडकडीत बंद

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 9:06PM

बुकमार्क करा
भाळवणी : वार्ताहर

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या दंगलीच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे सर्व पक्षियांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. गावात कुठलाही अनुचित प्रकार घडलाही नाही. या बंदला व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन आपापली दुकाने व व्यवहार बंद ठेवून 100 टक्के प्रतिसाद दर्शविला. बुधवारी सकाळी (दि. 3) घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी एस.टी. स्टॅन्ड चौकात एकत्र आले. त्याठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख तथा पं.स. सदस्य संभाजी शिंदे यांनी, भीमा -कोरेगाव येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून काही समाजकंटक जातीय तेढ निर्माण करून जातीयवाद पेटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा समाजकंटकाना शोधून काढून त्यांना तत्काळ शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केली. 

यावेळी  गावातून शांततेत फेरी काढून बंदचे आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला सर्वानुमते सहमती दर्शवून गावातील व्यापार्‍यांनी 100 टक्के आपापली दुकाने बंद ठेवली.  यावेळी तंटामुक्‍ती समिती अध्यक्ष इ. बा. मुलाणी, दीपक गवळी, हरिभाऊ शिंदे, आर. पी. आय.चे जिल्हा उपाध्यक्ष कुमार भोसले, अध्यक्ष प्रवीण शिंदे, विष्णुपंत गवळी, धनाजी शिंदे, दिलीप भानवसे, ज्ञानेश्‍वर खरडकर, अरूण गायकवाड, सचिन भोसले, मधुकर गायकवाड, दाऊद शेख, लुकमान इनामदार आदी उपस्थित होते.      

श्रीपूरमध्ये शांततेत बंद

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र  बंदला माळशिरस तालुका पूर्व भागातून चांगला प्रतिसाद मिळाला असून श्रीपूर, महाळुग, बोरगांव, माळखांबी आदी गावात शांततेत बंद पाळण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद काळात दवाखाने, मेडिकल, पेट्रोल पंप,  शाळा ,   महाविद्यालये, भाजी मंडई या अत्यावश्यक सेवा वगळता श्रीपूरमधील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

श्रीपूरमधील संदीप घाडगे व काही कार्यकर्त्यानी डॉ.आंबेडकर चौकात काही वेळ रास्ता रोको करून निषेध नोंदिवला. तर आर.पी.आय. कार्यकर्त्यांनी शांतेत बंद करून भीमा कोरेगांव प्रकरणातील संबंधितावर कठोर कारवाई व्हावी म्हणून पोलिसांना निवेदन दिले. यावेळी आर.पी.आय. शहर अध्यक्ष बापू  पोळके, बी.टी.शिवशरण, गौतम आठवले, तालुकाध्यक्ष  प्रा.नरेंद्र भोसले,राजू सुरवसे,सचिन ताकतोडे,सुधीर भोसले, राजकुमार शेंडगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.