Sun, Apr 21, 2019 05:48होमपेज › Solapur › महंत तुकोजीबुवा यांचे अधिकार कायम

महंत तुकोजीबुवा यांचे अधिकार कायम

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 15 2018 1:45AM

बुकमार्क करा
तुळजापूर : प्रतिनिधी

श्री तुळजाभवानी देवीच्या चरणतीर्थ पूजेच्या वेळी भाविकांकडून वाहिल्या जाणार्‍या रोख व वस्तू स्वरूपातील दक्षिणा, तसेच नंदादीपात भाविकांकडून वाहिलेल्या शिल्लक तेलाचा महंत तुकोजीबुवा गुरू बजाजी बुवा यांना उपभोग घेण्यास मंदिर संस्थांनच्या विश्‍वस्त समितीने ठराव घेऊन मंदिर प्रशासनाने प्रतिबंध घातल्याच्या विरोधात महंत तुकोजी बुवा गुरू बजाजी बुवा यांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण कोर्टात याचिका दाखल केली असता, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी महंतांना चरणतीर्थ प्राप्ती दक्षिणा व नंदादीप तेल या बाबतीत व्यवस्थापक तथा तहसीलदार यांचे आदेश जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला आहे. महंतांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेसंदर्भात सर्व विश्‍वस्तांना नोटीस काढण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्या विश्‍वस्त समितीने 31 ऑक्टोबर 2017 रोजी सभेमध्ये ठराव घेऊन तुळजाभवानी मंदिराचे महंत तुकोजी बुवा गुरू बजाजी बुवा यांनी त्यांच्या मठाकडे असणार्‍या चरणतीर्थ सेवेच्या वेळेतील वाहिकाची प्राप्ती होऊ नये व नंदादीपासाठी भक्‍तांकडून आलेले मंदिरातील शिल्लक तेल घेऊन जाऊ नये, असा ठराव संमत केला व त्या ठरावानुसार जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष यांनी  मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना ठरावानुसार अंमलबजावणी करा, असे पत्र वजा आदेशीत केल्यामुळे मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार तुळजाभवानी मंदिर यांनी 16 डिसेंबर 2017 रोजी महंत तुकोजीबुवा यांना चरणतीर्थ पूजा वेळेचे उत्पन्न व नंदादीपमधील तेल घेऊ नये, असे आदेशीत केले.

त्यावर महंत तुकोजी बुवा गुरू बजाजी बुवा यांनी अ‍ॅड. शिरीष कुलकर्णी, अ‍ॅड. सारंग जोशी, यांच्यातर्फे श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष व सर्व विश्‍वस्तांवर अवमान याचिका दाखल केली होती.
या अवमान याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, महंताना 3 सप्टेंबर 2009 रोजी नंदादीपास भक्‍तांनी वाहिलेले तेल आपण घेऊन जात आहात व मंदिराची दिवाबत्ती प्रकाश व्यवस्था व रोषणाई आपण करीत नाहीत, तरी आपण मंदिराचे विद्युतबिल भरावे, असे व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी नोटीस देऊन आदेशीत केले होते. 

त्यावर महंतांनी विधीज्ञामार्फत उत्तर देत नमूद केले होते की, पूर्वापार रुढी परंपरेप्रमाणे देवीभक्‍तांनी अर्पण केलेले तेल वाकोजी बुवा मठास घेण्याचा अधिकार व मान आहे, मंदिरातील कमी जास्त साठ्यावर लक्ष ठेवण्याचे अधिकार हे पूर्वीपासून व अनादिकाळापासून मठाकडेच आहेत, वार्षिक सण, उत्सव, दैनंदिन देवीचे धार्मिक विधी व कार्यक्रम यामध्ये नंदादीप सतत तेवत ठेवणे, दीपमाळा व आराध्याच्या पोतांना, भेंडोळी, कल्लोळ दीपपूजन व इतर उपदेवतांना तेल पुरवठा करण्याची सेवा ही पूर्वीपासून परंपरेने मठाकडेच आहे व ती सध्यासुध्दा निर्विघ्नपणे चालू आहे. 

मंदिरात सन 1937 पासून विद्युत पुरवठा सुरू झाला असून, आतापर्यंत विद्युत पुरवठा बिल मंदिर खजिन्यातूनच दिले जाते. यापूर्वी माझे गुरु व गुरूंचे गुरू यांना अशा प्रकारची मागणी मंदिर संस्थानने केलेली नाही. 70 वर्षांनंतर अशी बेकायदेशीर मागणी करण्यात आलेली आहे. शासनाने जे मठास मुन्तखब दिलेला आहे, त्यामध्ये अट ही फक्‍त नंदादीप व देवीच्या पूजा याच नमूद आहेत, त्यामुळे तेलाद्वारे रोषणाई करणे हे अपेक्षित आहे, त्यामुळे मठाने विद्युत बिल भरा, हे म्हणणे बेकायदेशीर आहे, असे उत्तर दिले.

त्यानंतर उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांनी 25 मे 2010 रोजी मंदिराचे विद्युत बिल भरले नाही तर इनाम जमीन जप्त करण्याचे आदेशीत केले. या विरोधात महंतांनी आपल्या सेवा चालू आहेत. दिलेली नोटीस रद्द करण्याची विनंती केली, पण उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांनी बेकायदेशीरपणे, महंत सेवा करीत नाहीत, मुन्तखबमधील अटी व शर्तीचा भंग केला म्हणून 25 मे 2010 रोजी मठास दिलेली जमीन जप्त करण्याचे आदेश दिले होते. 

त्यानंतर महंतांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद येथे या आदेशावर अपील दाखल केल्याने त्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी निकाल देऊन उपविभागीय अधिकारी यांना अधिकार नसल्यामुळे त्यांचे 31 मार्च 2011 रोजीचे आदेश रद्द करण्यात आले होते. परंतु जमीन जप्तच राहील, असे व शर्त भंगाच्या मुद्यावर प्रकरण शासनाकडे संदर्भित करण्यात येते, असे आदेशीत केले. त्यावर महंतांनी रिव्हिजन पिटीशन हे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण येथे दाखल केले व कोर्टाने 21 फेबुवारी 2012 रोजी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश स्थगित केले. सुनावणीनंतर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांचा निकाल रद्द केला. 
त्यामुळे वाकोजीबुवा मठाकडे दिलेले तेलाचे अधिकार या मुद्यावर प्रकरण तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व शेवटी महसूल न्यायाधिकरण औरंगाबाद याच मुद्यावर अंतिम निकाल दिलेला असतानाही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष व सर्व विश्‍वस्त यांनी बेकायदेशीर ठराव घेऊन वरील न्यायालयाचा निर्णय असूनही त्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका 6 जानेवारी 2017 रोजी दाखल केली. 

त्यावर 12 जानेवारी 2018 रोजी युक्तिवाद होऊन औरंगाबाद येथील महसूल न्यायाधिकरण यांनी अंतरिम आदेश देऊन विश्‍वस्थांनी केलेल्या ठरावानुसार व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी महंतांना चरणतीर्थ प्राप्ती दक्षिणा व नंदादीपास आलेले तेलाबाबतीत निर्णय देऊन सदर व्यवस्थापक तथा तहसीलदार यांचे आदेश जैसे थे ठेवण्याचे आदेश 7 मार्च 2018 पर्यंत दिलेले आहेत व स्थगिती आदेशासाठी 7 मार्च 2018 रोजी प्रकरण ठेवलेले आहे. आता 7 मार्चला संबंधित विश्‍वस्त काय म्हणणे सादर करतात व  न्यायालयाचा त्यावर पुढील निर्णय काय असेल, याकडे तुळजापूरवासियांचे लक्ष लागले आहे.