होमपेज › Solapur › सहा मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित

सहा मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Published On: Dec 17 2017 1:32AM | Last Updated: Dec 16 2017 10:31PM

बुकमार्क करा

माढा ः वार्ताहर

माढा तालुक्यातील सहा मुद्रांक विक्रेत्यांचा मुद्रांक विक्रीचा परवाना मुद्रांक जिल्हाधिकारी एस. एन. दुतोंडे यांनी एक महिन्यासाठी निलंबित केला असल्याची माहिती दुय्यम निबंधक अशोक चव्हाण यांनी दिली. सुरेश प्रभाकर कदम, फारुक मकबूल शेख, सैफन रज्जाक कोरबू, कल्याण मगन बाबर, सलीम रज्जाक कोरबू, अशोक भीमराव जाधव अशी परवाने निलंबित केलेल्या मुद्रांक विक्रेत्यांची नावे आहेत. मुद्रांक विक्री व साठा नियम 1934 मधील तरतुदींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली.

मुद्रांक विक्रेत्यांनी दर  महिन्याच्या एक ते पाच तारखेदरम्यान नोंदवही तपासणीस देणे आवश्यक आहे. याबाबत दुय्यम निबंधकांनी नोंदवही तपासणी करणे व मुद्रांक व कोर्ट फी तिकिटे काढण्याविषयी लेखी सूचित केले होते, तरीही काही मुद्रांक विक्रेत्यांनी सूचनेचा अंमल न केल्याने दुय्यम निबंधकांनी मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
माढा तालुक्यात एकूण बावीस मुद्रांक विक्रेते आहेत.

यामध्ये माढा 13, कुर्डुवाडी 4, मोडनिंब 1, टेंभुर्णी 3,  वडशिंगे 1 येथील मुद्रांक विक्रेत्यांकडून विक्री केली जाते. या विक्रेत्यांचा परवाना ज्याठिकाणी आहे तेथेच त्यांनी तो विक्री करणे व मुद्रांक साठा किती त्याचा भाव फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. दस्तलेखणीचे काम करणार्‍यांनी दस्तलेखणीचे दरपत्रक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. प्रत्येक पानास पाच रुपये व जास्तीत जास्त शंभर रुपये असा दस्तलेखणीचा दर असल्याचे दुय्यम निबंधकांनी सांगितले.