Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Solapur › मनसेच्या शहर कार्यकारिणीला मुहूर्त कधी?

मनसेच्या शहर कार्यकारिणीला मुहूर्त कधी?

Published On: Jun 21 2018 1:18AM | Last Updated: Jun 20 2018 10:16PMसोलापूर ः रामकृष्ण लांबतुरे 

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या वाढदिवसानंतर मनसे अंतर्गत निवडणुका आणि काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. मात्र घाईगडबडीत बरखास्त करण्यात आलेली सोलापूर शहर कार्यकारिणी गेल्या तीन महिन्यांपासून रिक्‍तच आहे. त्याचा मुहूर्त कधी लागणार, याबाबत मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्व नेते एकत्रित येत असल्याची चर्चा होत असताना यात उडी घेऊन राज ठाकरे यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा पहिला ‘गिअर’ आपण टाकल्याचे वक्‍तव्य करुन राजकीय वर्तृळात लक्ष वेधून घेतले. मात्र तब्बल पन्नासच्या वर असलेली सोलापूर शहर कार्यकारिणी बरखास्त  केली असून याचा गिअर कधी टाकणार, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. येणार्‍या निवडणुकांच्या तोंडावर शहराची कार्यकारिणी रिक्‍त ठेवणे पक्षाला पुढच्या राजकीय मार्गात कठीण जाणार आहे. 

राज्य पातळीवर 10 नेते, 12 सरचिटणीस अशी नवी फौज मनसेने जाहीर केली. त्यात बाळा नांदगावकर यांची नेतेपदी परत निवड करण्यात आली आहे. तेच सोलापूर दौर्‍यावर आले असता स्थानिक वाद पाहून अचानक तडकाफडकी शहर कार्यकारिणी बरखास्त केली.  चार भिंतीत झालेल्या बैठकीतील गदारोळामुळे बाळा नांदगावकर यांनी शहर कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला. कार्यकारिणी बरखास्त झाली तरी दोन शहराध्यक्ष, शहर संघटक, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, मनसे कामगार सेना अशा 50 च्यावर असलेल्या मनसे पदाधिकार्‍यांनी कोणत्याही इतर पक्षांची वाट धरली नाही.

आपण आणखीन दिलसे मनसे पक्षात असल्याचे खासगीत सांगत आहेत. नव्या कार्यकारिणीत आपला परत समावेश होईल, परत मोठे पद नव्याने मिळेल या आशेपोटी पक्षाच्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत. नुकतेच माजी शहराध्यक्ष प्रशांत इंगळे यांच्या वाढदिवसादिवशी  पक्षातील सर्वांनी एकत्रित येऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी कापण्यात आलेल्या केकवर ‘अध्यक्ष’  ठळकपणे अक्षर दिसत होते. याचाच अर्थ कार्यकारिणी बरखास्त होऊनही पदाधिकार्‍यांचा पक्षाविषयीचा लळा  कायम असल्याचे दिसून येते. 

यांच्यावर होणार का कारवाई?

मनसेच्या स्थापनेपासून जिल्हा संघटक पदावर एकच व्यक्‍ती आहे. त्याचे मूल्यमापन आणखी झाले नाही. शहर कार्यकारिणीतील व्यक्‍तीवर एखादा अपवाद वगळता गंभीर स्वरुपाचे पोलिसांत गुन्हे दाखल नाहीत. मात्र ग्रामीण भागातील काही तालुकाध्यक्षांवर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यापासून पीडित असलेले ठेकेदार सोलापूर शहरात येऊन पत्रकार परिषदा घेऊन माध्यमांकडे न्यायाची मागणी करतात. जिल्हा संघटकावर  गुन्हे दाखल आहेत तसेच महापालिका निवडणुकीत माजी संपर्कप्रमुख बाबा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची यादी तयार करण्यात आली होती. यातच कामगार नेते म्हणून मिरवणार्‍यांनी पक्षाचा एबी  फॉर्म आल्यावर इतरांना घेऊन निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला. अशांवर कारवाई गरजेची असताना खर्‍या मनसैनिकांवर कारवाई झाल्यास अन्याय केल्यासारखे होणार आहे. 

नेते बाळा नांदगावकरांनी घेतला घाईत निर्णय 

बाळा नांदगावकर यांनीच सोलापूरची कार्यकारिणी निवडून एक चांगली फळी तयार केली होती. यातील भूषण महिंद्रकर, सुभाष पाटील (पक्ष सोडला होता), यशवंत चव्हाण यांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्य तुल्यबळ होते. मात्र पक्षातील काही पदाधिकार्‍यांच्या कुरघोडीमुळे खटके  उडाले. परिणामी अशाप्रकारे पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करणे म्हणजे सच्च्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला विषय आहे.  सरचिटणीस  शालिनी ठाकरे यांच्याकडे नांदगावकर यांनी आपला निर्णय घाईत झाल्याची कबुली दिल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.