Tue, May 21, 2019 19:00होमपेज › Solapur › आमदार परिचारकांचे विमान जमिनीवर

आमदार परिचारकांचे विमान जमिनीवर

Published On: Jun 22 2018 2:04AM | Last Updated: Jun 21 2018 11:05PMपंढरपूर : प्रतिनिधी

विधानपरिषदेचे निलंबन मागे घेतल्यानंतर आ. प्रशांत परिचारक यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी नेटाने सुरू केली असून एरव्ही  सत्तेच्या हवेत फिरणारे परिचारकांचे विमान जमिनीवर आल्याचे पाहून कार्यकर्ते सुखावले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष निश्‍चित नसला तरीही विधानसभा लढवण्याचा आ. परिचारकांचा निर्धार त्यांच्या एकूणच सार्वत्रिक सक्रियतेवरून स्पष्ट झाला आहे. 

आ. प्रशांत परिचारक हे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. मागील वर्षभर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे परिचारकांच्या सार्वजनिक तसेच प्रशासकीय कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिचारकांचे निलंबन मागे घेतले गेल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने परिचारक कामाला लागल्याचे दिसत आहेत. एरव्ही अर्बन बँक, साखर कारखाना, जिल्हा दूध संघ यामध्येच दिसणारे परिचारक मागील चार महिन्यांपासून  शहरातील गल्लीबोळात, गावा-गावांत दिसत आहेत. कार्यकर्त्यांशी बोलण्याची, वागण्याची त्यांची पद्धत कमालीची बदलली असून विरोधकांच्या नजरेतून एरव्ही हवेत असणारे परिचारक आता जमिनीवर आल्याचे दिसत आहेत. विविध राजकीय, सामाजिक कार्यक्रम असोत की वैयक्‍तीक कार्यक्रमासही त्यांची हजेरी आणि त्यांचा वावर त्यांच्यामध्ये झालेल्या बदलाची जाणीव करून देणारा आहे. गेल्या वर्षभरात परिचारक जरी निलंबीत असले तरीही त्यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून, मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन पंढरपूर शहर, तालुक्यातील विविध प्रश्‍न सोडवलेले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, नामसंकीर्तन सभागृहाचे भूमिपूजन, भूमिगत गटार योजनेच्या पुढील टप्प्यास मिळालेली मंजुरी, यात्रा अनुदानात केलेली वाढ यासह  शहरातील विकास कामांसाठी त्यांनी प्रयत्न, पाठपुरावा करून निधी मिळवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यानंतर पंढरपूर शहर धूळ आणि खड्डेमुक्‍त होणार आहे.  शहरातील इतर विकास कामांनाही चांगलीच गती आलेली असल्याने येत्या वर्षभरात शहराचे रूप पालटल्याचे निश्‍चितच दिसणार आहे. एका बाजूला आपल्या ताब्यातील सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालवत असतानाच दुसर्‍या बाजूला आपल्याकडील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभारही लोकाभिमूख आणि विकासाभिमूख राहील याकडे परिचारकांचे कटाक्षाने लक्ष असल्याचे दिसत आहे.  परिचारक गटाकडून सुधाकरपंत परिचारक, आ. प्रशांत परिचारक, उमेश परिचारक यांच्या नावांची चर्चा होत आहे. मात्र स्वत: प्रशांत परिचारक हेच परिचारक गटाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असतील आणि कदाचित ते अपक्ष किंवा भाजप पुरस्कृत निवडणूक लढवतील असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून बोलले जाते. सुधाकरपंतांनी सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून बांधलेली मतांची मोळी आणखी मजबूत करण्याचा आ. परिचारक सध्या प्रयत्न करीत आहेत. मंगळवेढा तालुक्यातही अर्बन बँक, जिल्हा दूध संघ, युटोपीयन शुगर्सच्या माध्यमातून परिचारक गटाने गावा-गावांत बांधणी सुरू केलेली आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीची आ. परिचारकांनी जोरदार तयारी सुरू केली असून त्यांचे जमिनीवर आलेले विमान कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे आहे.  

भाजप पूरस्कृत किंवा अपक्ष लढण्याची तयारी ?

सध्या आ. परिचारक भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून काम करीत आहेत. त्यांनी किंवा त्यांच्या एकाही समर्थकाने अद्यापही भाजपमध्ये  अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. त्यांच्या गटातील बहुतांश कार्यकर्त्यांचा भा. ज. प. प्रवेशाला विरोध दिसत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांचेही भाजपविषयी प्रतिकूल मत असल्यामुळे परिचारकांचा भाजप प्रवेश झालेला नाही.पक्षापेक्षाही स्वत:च्या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुरू केल्याचे दिसते.  भाजपविषयी सध्या तालुक्यात शेतकरी, व्यापारी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांकामध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून अपक्ष निवडणूक लढवण्याचा परिचारकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.