Wed, May 22, 2019 06:21होमपेज › Solapur › आयुक्‍तालयामध्ये ‘एम पासपोर्ट’ सुविधा

आयुक्‍तालयामध्ये ‘एम पासपोर्ट’ सुविधा

Published On: Mar 22 2018 10:54PM | Last Updated: Mar 22 2018 10:36PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये पासपोर्ट पडताळणीसाठी सर्व पोलिस ठाण्यांमधून  ‘एम पासपोर्ट’ सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी लागणारे  टॅबलेट मोबाईल पोलिस आयुक्‍त महादेव तांबडे  यांच्या हस्ते विशेष शाखा व सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना  देण्यात आले. त्यामुळे आता नागरिकांना पासपोर्ट मिळणे सुलभ होणार आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने जानेवारीमध्ये आयुक्‍तालयात ‘एम पासपोर्ट’ सुविधा सुरू नसल्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आयुक्‍तालयात टॅबलेट मोबाईल खरेदीची प्रक्रिया राबवून ही सुविधा सुरू करण्यात आली.

पासपोर्ट अर्जदारांची पोलिस पडताळणी ही कमीत कमी कालावधीत होऊन अर्जदारास पासपोर्ट लवकर प्राप्त होण्यासाठी भारत सरकार आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्या विद्यमाने पोलिस विभागासाठी ‘एम पासपोर्ट’ पोलिस अ‍ॅप हे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपचा वापर करून पोलिस विभागाच्या वतीने अर्जदाराचा पासपोर्ट पडताळणी रिपोर्ट ऑनलाईन सादर करता येणार आहे. ही सुविधा सोलापूर ग्रामीण पोलिस दलात सुरू झाली होती. परंतु ही सुविधा सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये सुरू झालेली नव्हती. त्यामुळे जानेवारी महिन्यात दै. ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते.

याची दखल घेत पोलिस आयुक्‍त महादेवत तांबडे यांनी ‘एम पासपोर्ट’ सुविधेसाठी आवश्यक असणारे टॅबलेट मोबाईल खरेदी प्रक्रिया त्वरित राबवून ही सुविधा सुरू केली. 
बुधवारी आयुक्‍तालयातील विशेष शाखा व पासपोर्टचे काम पाहणारे कर्मचारी तसेच शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना व पासपोर्ट पडताळणीचे काम पाहणार्‍या कर्मचार्‍यांना आयुक्‍त तांबडे यांच्या हस्ते टॅबलेट मोबाईलचे वितरण करण्यात आले. त्यानंतर विशेष शाखेतील पोलिस नाईक लक्ष्मीकांत धोत्रे यांनी ‘एम पासपोर्ट’ पोलिस अ‍ॅपबाबत कार्यशाळा घेऊन कर्मचार्‍यांना याबाबत प्रशिक्षण दिले. 

यावेळी उपायुक्‍त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. दीपाली काळे, पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलिस कर्मचारी पटेल, इंगळगी, पोलिस ठाण्यांचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

अशाप्रकारे चालणार काम
पासपोर्ट पडताळणीचे काम पाहणारे पोलिस कर्मचारी आता प्रत्यक्ष पासपोर्ट अर्जदाराच्या राहत्या घरी जाऊन अर्जदाराचा फोटो, त्याची कागदपत्रे, पडताळणी अहवाल हा ‘एम पासपोर्ट’ पोलिस  अ‍ॅप  अ‍ॅप्लिकेशनमध्ये ऑनलाईन  अपलोड करणार आहेत. हा पडताळणी रिपोर्ट पोलिस आयुक्‍त कार्यालयातील पासपोर्ट विभागास ऑनलाईन प्राप्त झाल्यानंतर रिपोर्टची पाहणी करुन पोलिस आयुक्‍त कार्यालयाकडून त्याचा अहवाल विभागीय पासपोर्ट कार्यालयास ऑनलाईन पाठविण्यात येईल. त्यामुळे अर्जदारास लवकरात लवकर पासपोर्ट मिळणे सुलभ होणार आहे.

Tags : solapur Commissionerates, M Passport facility