Thu, Jul 18, 2019 04:10होमपेज › Solapur › सोलापुरात लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्या हळूहळू पूर्वपदावर

सोलापुरात लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्या हळूहळू पूर्वपदावर

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 11:26PMसोलापूर : प्रतिनिधी

वडशिंगे-वाकाव-माढा या रेल्वेमार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरु झाल्याने अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते. त्या एक्स्प्रेस गाड्या मंगळवारपासून आपल्या निर्धारित मार्गावर धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

दुहेरीकरणाचे काम सुरु झाल्याने इंद्रायणी (सुपरफास्ट इंटरसिटी) 1 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्याबरोबर गाडी क्र 16351 मुंबई-नागरकोईल एक्स्प्रेस, 17031 मुंबई-हैदराबाद, 11041 मुंबई-चेन्नई एक्स्प्रेस, 11019 मुंबई-भुवनेश्‍वर या एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते.

या एक्स्प्रेस गाड्या सोलापूर स्थानकावरुन  न जाता गुंटकल-मिरज-पुणे या मार्गावरुन प्रवास करत होत्या. या एक्स्प्रेस गाड्या इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग ब्लॉकच्या काळात माढा-वडशिंगे-वाकाव रेल्वेमार्गावरुन जात असल्याने ब्लॉकमध्ये अडकून पडतील म्हणून यांचे मार्ग बदलण्यात आले होते. 1 एप्रिलपासून या एक्स्प्रेस गाड्या दुसर्‍या मार्गावरुन जात होत्या.
मंगळवार 10 एप्रिलपासून रेल्वे प्रशासनाने लांबपल्ल्यांच्या या चारही  एक्स्प्रेस गाड्यांना आपल्या निर्धारित मार्गावरुन जाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे दक्षिण भारतात जाऊन सोलापूर स्थानकात परत येणार्‍या प्रवाशांची सोय होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

सोलापूर-पुणे यादरम्यान दुपारच्या वेळी धावणारी इंद्रायणी (सुपर फास्ट इंटरसिटी) मात्र अद्यापपर्यंत चालू झालेली नाही. उद्यान एक्स्प्रेसचाही मार्ग बदलण्यात आला आहे. उद्यानला  त्याच्या निर्धारित मार्गावर आणण्यात आले नाही. 15 एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल व सर्व रेल्वेगाड्या आपल्या निर्धारित मार्गावरुन धावतील.  हळूहळू लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांना पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न चालू असल्याची माहिती  देण्याती आली.
 

Tags : Solapur,  trains