Thu, Jul 18, 2019 14:22होमपेज › Solapur › राष्ट्रवादीकडून पुन्हा मोहिते-पाटलांचीच शक्यता

राष्ट्रवादीकडून पुन्हा मोहिते-पाटलांचीच शक्यता

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:33PMपंढरपूर: प्रतिनिधी

 माढा लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत खा. विजयदादांना कोणता पर्याय द्यायचा याची चाचपणी सध्या विरोधी गोटात सुरू असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडेही मोहिते-पाटलांशिवाय दुसरा सक्षम पर्याय दिसत नाही. त्यामुळे खा.विजयदादांना आव्हान देण्यासाठी कोण रिंगणात उतरणार याकडे लक्ष लागले आहे.  दरम्यान भाजपकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आणि उत्तम जानकर यांना संधी दिली जाईल असे बोलले जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार आहेत. 1 काँग्रेस, 1 शेकाप आणि 1 आमदार शिवसेनेचे आहेत. मात्र या मतदारसंघात सर्वच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा मोठा आणि निर्णायक प्रभाव असल्याने माढा मतदारसंघ जिंकण्याकरिता विरोधकांना कंबर कसावी लागणार आहे. 2014 च्या मोदी लाटेतही खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या एकट्याच्या बळावर अशक्य असा विजय मिळवून बालेकिल्ला शाबूत राखला होता. दरम्यानच्या काळात राजकीय घडामोडी बदलत आहेत. ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागीलवेळी भाजपच्या मदतीने मोहिते-पाटलांना जेरीस आणले ती शेतकरी संघटना आता भाजपपासून वेगळी झाली असून स्वतंत्र उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर भारतीय जनता पक्षानेही आता स्वत:चा उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच उमेदवार मिळणार असल्याचे मानले जात आहे. खा. विजयदादांनी नकार दिला तर त्यांचे चिरंजीव माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या गळ्यात उमेदवारी टाकावी लागणार आहे. मोहिते-पाटील यांच्याशिवाय सर्व 6 तालुक्यात चालेल असा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसकडेही नाही त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते-पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे मानून पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. 

विरोधी गोटात अद्यापही फारशी हालचाल नसली तरी भारतीय जनता पक्षाकडून संभाव्य उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचे नाव पुढे येऊ शकते. भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुक्यातील नेते उत्तम जानकर यांनाही सामाजिक मतांचे समीकरण लक्षात घेता भाजपकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान निर्णायक असून या समाजाची व्होट बँक उत्तम जानकर यांच्यामुळे भाजपकडे येऊ शकते हा विचार भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनाही या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून पुरस्कृत केले जाऊ शकते. यापुर्वी महादेव जानकर यांनी अपक्ष निवडणूक लढवताना 1 लाख मते मिळवली होती. माण, खटाव, फलटण, सांगोला, करमाळा, माळशिरस या तालुक्यात ना. जानकर निर्णायक ठरणार आहेत त्यामुळे त्यांनाही भाजपकडून उमेदवार दिली जाईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गत निवडणुकीत जोरदार लढत दिली असली तरी यावेळी परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे यावेळी स्वाभिमानीचा वेगळा उमेदवार आणि भाजपचा वेगळा उमेदवार असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडूनही भाजपसोबत आघाडी न झाल्यास स्वतंत्र उमेदवार दिला जाईल हे निश्‍चित मानले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधकांची मतविभागणी होऊन मोहिते-पाटील यांचा विजय सहज सोपा असल्याचे मानले जात आहे. खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गेल्या 4 वर्षांत मतदारसंघातील प्रत्येक गावात निधी दिला आहे. सततचा लोकसंपर्क आणि पंढरपूर-लोणंद रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लावला आहे. 

त्यामुळे मोहिते-पाटील यांच्याबद्दल मतदारसंघात अतिशय चांगले वातावरण असल्याचे आजचे चित्र आहे.  या पार्श्‍वभूमीवर खा. विजयदादांना सक्षम पर्याय देण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे मानले जात आहे.