Wed, May 22, 2019 10:16होमपेज › Solapur › आरक्षण डावलून अकरावी प्रवेशाची यादी जाहीर!

आरक्षण डावलून अकरावी प्रवेशाची यादी जाहीर!

Published On: Jul 03 2018 2:16AM | Last Updated: Jul 03 2018 1:55AMसोलापूर : दीपक होमकर

अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये जातीनिहाय आरक्षण देणे शैक्षणिक संस्थांना बंधनकारक असतानाही सोलापूर येथील कुचन कनिष्ठ महाविद्यालय, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि सोशल कनिष्ठ महाविद्यालय यांनी अशा प्रकारचे आरक्षण डावलून प्रवेशाची गुणवत्ता यादी लावली असल्याचे दृष्टिपथास आले आहे.

सोमवारी अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत झळकली. वालचंद, संगमेश्‍वर, दयानंद महाविद्यालय यासारख्या मोठ्या महाविद्यालयांबरोबर आयएमएस, व्ही. जी. शिवदारे यासारख्या विनाअनुदानित महाविद्यालयांनीसुद्धा  गुणवत्ता यादी लावताना जातीनिहाय गुणवत्ता यादी लावली; मात्र पद्मशाली शिक्षण संस्थेच्या कुचन प्रशाला, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाने जातीनिहाय आरक्षणाचा कोणताही उल्लेख न करता आलेले सर्व अर्ज एक करत त्यांची गुणवत्ता यादी एकत्रित प्रसिद्ध केली आणि आरक्षणाला फाटा दिला असल्याचे दिसून आले आहे. 

कुचन प्रशालेमध्ये अकरावी विज्ञान शाखेसाठी 121 जागांसाठी यादी लावली असून त्यामध्ये केवळ विद्यार्थ्यांचे नाव आणि त्याला मिळालेले गुण इतकेच नमूद केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांचा संवर्गसुद्धा त्यामध्ये नोंदविला नाही. तीच परिस्थिती वाणिज्य शाखेतील प्रवेशाच्या गुणवत्ता यादीची असून 123  विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांचे गुण अशा दोनच गोष्टींचा उल्लेख करत आरक्षण डावलून त्यांनी  प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. भू. म. पुल्ली कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्येही आरक्षणनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविली गेली नसल्याचे दिसते आहे. पुल्ली प्रशालेने 121 विद्यार्थिनींची नावे आणि त्यांचे गुण टक्केवारी, प्रवेश अर्जाचा क्रमांक आणि तो स्वीकारल्याचा क्रमांक अशा सहा कॉलमची गुणवत्ता यादी लावली आहे. मात्र त्यामध्ये विद्यार्थ्यांचा संवर्ग आणि आरक्षणाची वेगळी यादी लावलेली नाही. 

सोशल महाविद्यालयात प्रवर्गानुसार मेरिट असा उल्लेख करून आठ ओबीसी विद्यार्थ्यांची नावे लिहिली आहेत, तर 106 ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. एससी, एसटी आदी कॅटेगरीचा उल्लेखही गुणवत्ता यादीत नाही. अशीच प्रक्रिया कॉमर्स आणि कला मराठी माध्यमासाठी राबविण्यात आली आहे.