Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Solapur › जीवघेण्या अफवेच्या गर्दीत लोकांची ‘माणुसकी’ हरपली 

जीवघेण्या अफवेच्या गर्दीत लोकांची ‘माणुसकी’ हरपली 

Published On: Jul 06 2018 10:13PM | Last Updated: Jul 06 2018 9:02PMगुन्हेगारी विश्‍व   रामकृष्ण लांबतुरे 

मुले पळवून नेणार्‍या टोळीबाबत उठलेल्या जीवघेण्या अफवेच्या गर्दीत काळजाचा थरकाप उडणार्‍या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांत 27 जणांचा निष्पाप बळी गेला आहे. एखादा सापडला की त्याची कसलीही शहनिशा करायची नाही. गर्दीत जमा होऊन कुठला तरी राग मनात धरुन याठिकाणी काढून हात धुवून घ्यायचे. समोरचा विनवणी करीत असतो, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. खरेच या जीवघेण्या अफवेच्या गर्दीत लोकांची ‘माणुसकी’ हरपली असल्याचे सिद्ध झाले आहे.

नुकत्याच या अफवेने शहरातील आकाशवाणी केंद्राकडील नीलमनगरमध्ये बाहेरुन आलेल्या दोन बूटपॉलिशवाल्यांना जमावाने बेदम मारहाण केली. त्यानंतर पंढरपूरचे माजी नगरसेवक आणि विद्यमान नगरसेविका श्‍वेता डोंबे यांचे सासरे नंदकुमार डोंबे यांच्यासह तालुक्यातील दोनजणांना नंदूरबार जिल्ह्यात जमावाने मारहाण केली. अफवेचे पीक इथवर न थांबता धुळ्यातील घटनेने तर राज्यालाच काळीमा फासला. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील पाचजणांचा दगडाने, दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारले.  झारखंड 7, महाराष्ट्र 5, तामिळनाडू 3, तेलंगणा 2, त्रिपुरा 2, कर्नाटक 2, आसाम 2, गुजरात 1, पश्‍चिम बंगाल 1, आंध्र प्रदेश 1, मध्य प्रदेश 1 अशा आतापर्यंत या अफवेत 27 जणांचा बळी गेला आहे. प्रत्येक घटनेत बळी गेलेला बाहेरचा असल्याचे पाहावयास मिळाले आहे. बाहेरच्या गावचा, राज्यातला किंवा इतर धर्मातला जो नवा आहे हे पटकन ओळखू येते, तो टार्गेट होतो. काही सेकंदात जमाव गोळा केला जातो आणि संशयिताची माहिती क्षणोक्षणी देत ती भडकावली जाते. यात बदला घेण्याचेही प्रकार उघड होत आहेत. मुले चोरणारा म्हणून आपलाच  फोटो व्हायरल झाल्याचेही एका गावकर्‍याच्या सुदैवाने लक्षात आले. 

पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाल्याचेही उघड झाले. त्यामुळेच प्रत्येक अफवेवर, सोशल मीडियावर आलेल्या माहितीचा सखोल आणि तटस्थपणे विचार केला पाहिजे. ‘आले की पुढे ढकल’  या विचाराने सोशल मीडियासारखे जीवनातून उठवणारे हत्यार वापरता कामा नये. व्हॉटस्अ‍ॅप वापरावर कोणाचेच निर्बंध नसल्याने कोणीही याचा कसाही मिसयूज करीत आहे. खोट्या अफवा पसरविण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढत आहेत. एकाचवेळी लाखो लोकांना संदेश पोहोचत असल्याने हिंसाचार पसरवण्यामध्ये समाजकंटकांना मदत होत आहे. त्यामुळे व्हॉटस्अ‍ॅप एकप्रकारे सिरीयल किलरच बनत असल्याची भावना आता जनमानसांत दृढ होत आहे.  माणुसकी हरपत चालल्याने सर्व होत आहे, हे मात्र नक्की.