Wed, Jul 17, 2019 18:28होमपेज › Solapur › संपाकडे शेतकरी संघटनांची पाठ

संपाकडे शेतकरी संघटनांची पाठ

Published On: Jun 06 2018 1:44AM | Last Updated: Jun 05 2018 9:06PMपंढरपूर : प्रतिनिधी

एरवी उसदराच्या आंदोलनासाठी आकाशपाताळ एक करणार्‍या सर्वच शेतकरी संघटनांनी राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाकडे पाठ फिरवली आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर अपयशी ठरल्याचा ठपका उठसूठ केंद्र आणि राज्य सरकारवर ठेवणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसारख्या राजकीय पक्षांनीही शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे पंढरपूर तालुक्यात शेतकरी संप निष्प्रभ ठरलेला आहे. यावरून शेतकरी संघटनांना केवळ उसाचेच आंदोलन करायचे असते आणि काँग्रेस, राष्ट्रवादीला केवळ राजकीय हेतूने पोकळ आरोप करण्यातच रस असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. 

गेल्या चार दिवसांपासून राज्यासह देशाच्या काही भागांत शेतकरी संपावर गेलेले आहेत. त्यामुळे शहरात जाणारी दूध, भाजीपाला, फळे यांची वाहतूक प्रभावित झालेली आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरात भाजीपाल्याचे दर वाढू लागले आहेत. त्याचबरोबर शेतकरी संपावरून राजकारणही रंगू लागले असून शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर तालुक्यात मात्र शेतकरी संप पूर्णपणे निष्प्रभ ठरला असून पहिल्या दिवशी तालुक्याच्या काही गावांत दूध संकलन ठप्प झाले होते. त्याव्यतिरिक्त दुसर्‍या दिवसांपासून सगळे व्यवहार, बाजार समितीमधील आवक, भाजी मंडई आणि दूध संकलन सुरळीत सुरू आहे. मागील वर्षी झालेल्या शेतकरी संपास पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी प्रचंड मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे पाच-सहा दिवस तालुक्यातील सगळे शेतशिवार ठप्प झाले होते. बाजार समिती, पंढरपुरातील भाजी मंडई ओस पडली होती.

मात्र यावर्षी शेतकरी संघटनांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे संपाला शेतकर्‍यांचाही प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. एरवी उसदराच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार्‍या संघटना शेतकरी संपाबाबतीत मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही गावांत केलेल्या प्रयत्नांव्यतिरिक्त अन्य संघटनांनी काहीही केलेले नाही. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारविरोधात दररोज शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर अपयशी ठरल्याचा आरोप करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीनेही या संपास पाठिंबाही जाहीर केलेला नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी या आंदोलनास पाठिंबा दिलेला असला तरी तालुक्यातील राष्ट्रवादी मात्र थंडच आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षानेही शेतकरी संपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकार्‍याने या संपास पाठिंबाही दर्शवलेला नाही. त्यामुळे पंढरपूर तालुक्यात शेतकरी संप पूर्णपणे अपयशी ठरला असून संपाचा कुठेही, कसलाही प्रभाव दिसून येत नाही.