Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Solapur › भुकेल्यांना चार घास अन्नाचे; पोलिसांमध्येही माणुसकीचा पाझर

भुकेल्यांना चार घास अन्नाचे; पोलिसांमध्येही माणुसकीचा पाझर

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 11 2018 11:56PMसोलापूर : इरफान शेख

भुकेल्यांना पोटभर चार घास अन्नाचे खाऊ घातल्यास काय समाधान मिळतो याचा अनुभव प्रत्येक नागरिकाने घेतल्यास या देशात किंवा शहरात कोणीही उपाशी नाही झोपणार, हे मात्र नक्की. 

असाच एक अवलिया सोलापूर शहर पोलिसात पाहावयास मिळत आहे. मार्केट पोलिस चौकीतील हेड कॉन्स्टेबल नसीरोद्दीन शेख हे भुकेल्या वृध्दास स्वत:च्या हाताने चार घास अन्नाचे खाऊ घालत आहेत. मनाला समाधान वाटणारे हे चित्र पाहून  नागरिक या पोलिसावर कौतुकाचा वर्षाव  करत आहेत.

मार्केट पोलिस चौकीत गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असणारे हेड कान्स्टेबल नसीरोद्दीन शेख आसपासच्या गरीब व भीक मागून खाणार्‍या वृद्ध महिला व पुरुषांची काळजी घेत आहेत. ड्यूटी संपवून घरी जाण्याअगोदर व ड्यूटीवर आल्याबरोबर  दाल-चावल व पाण्याची बाटली घेऊन या भुकेल्यांची काळजी घेत आहेत. मार्केट पोलिस चौकी मलंग शाहवली दर्ग्याशेजारी असल्याने येथे भीक मागून खाणार्‍यांची संख्या जास्त आहे.

नसीरोद्दीन शेख 1993 साली शहर पोलिस दलात भरती झाले होते. तेव्हापासून आजतागायत ज्या पोलिस ठाण्यात  किंवा पोलिस चौकीत काम केले त्याशेजारी असलेल्या भिकार्‍यांची व मागून खाणार्‍या वृद्धांची  व  महिलांची दखल घेत त्यांना पोटभर अन्न मिळावे याची काळजी घेत आले असल्याची माहिती हे.कॉ. शेख यांनी दिली. कोणत्याही प्रकारचे उपकार मनात न बाळगता फक्‍त  पुण्य कमावणे व त्यांच्याकडून दुआ मिळावी या उद्देशाने हे कार्य करत असल्याची माहिती दिली.घरीदेखील कोणीही भीक मागणारी व्यक्ती आली  तर त्याला उपाशीपोटी पाठवत नाहीत.

अनेक वर्षांपासून रमजान महिन्यातील संपूर्ण रोजे (उपवास) पूर्ण होत आहेत. रोजे राहणे जसे अनिवार्य आहे, तसे समाजाची जबाबदारी पूर्ण करणेदेखील अनिवार्य आहे. रोजा राहून फक्त उपाशीपोटी दिवसभर राहणे म्हणेज रोजा झाला असे नाही, तर आपण देवासाठी रोजा ठेवतो तर त्याच देवाने या जगात पाठवलेल्या दीनदुबळ्यांना मायेचा हात फिरवत पोटभर अन्नाचे घास खाऊ घालणे तीदेखील एक प्रकारची प्रार्थना किंवा इबादत आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील  दीनदुबळ्यांची काळजी घ्यावी. कोणी विधवा महिला असेल तर आर्थिक मदत करावी.कोणी अनाथ असेल तर त्याचे पालकत्व घ्यावे.आपल्या पाहुण्यांत कोणी गरीब असेल तर त्याला आर्थिक पाठिंबा द्यावा, असा संदेश हेकॉ शेख यांनी यावेळी दिला.