Sun, Aug 18, 2019 20:36होमपेज › Solapur › वारकर्‍यांसाठी देशातील पहिलाच प्रयोग

मोबाईल हँडवॉश स्टेशनचा शुभारंभ

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी

जि.प. च्या स्वच्छ भारत मिशनतर्फे ‘पंढरीच्या दारी शाश्‍वत स्वच्छतेची वारी’ या उपक्रमांतर्गत देशातील पहिले मोबाईल हँडवॉश स्टेशन तयार केले आहे. याचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते झाला. वारीच्या काळात एकूण 4  हँडवॉश स्टेशन सेवेत राहणार आहेत. 

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कार्यकारी अभियंता कटकधोंड, मनुष्यबळ तज्ज्ञ शंकर बंडगर, सनियंत्रण तज्ज्ञ यशवंती धत्तुरे, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे उपस्थित होते. 

जि.प.च्या स्वच्छ भारत मिशन कक्षास डॉ. भारूड यांनी ही संकल्पना बोलून दाखविली होती. त्यानुसार या गाड्या कमी खर्चात बनविल्या आहेत. लहान वाहने 15 दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेऊन हँडवॉश स्टेशन बनविण्यात आली आहेत. 

हँडवॉश स्टेशनची वैशिष्ट्ये

या वाहनांवर सहा वॉश बेसीन बसविण्यात आली आहेत. हात धुण्यासाठी 1 हजार लिटरची टाकी बसविली आहे. हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून 1 हजार लिटर क्षमतेची टाकी बसविण्यात आली आहे. या वाहनांवर बसविण्यात आलेल्या स्पिकरवरून शौचालयाचा वापर तसेच हात स्वच्छ धुण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

या व्हॅनला चित्ररथाप्रमाणे सजविण्यात आले आहे. हात स्वच्छ धुण्याची पध्दत समजावून सांगणारी चित्रे देण्यात आली आहे. सांडपाण्याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी केला जाणार आहे. गोपाळ कालापर्यंत ही हँडवॉश स्टेशन कार्यरत राहणार आहेत.