Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Solapur › लातूरला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर, तर मग सोलापूरला का नाही?

लातूरला अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर, तर मग सोलापूरला का नाही?

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 9:25PMसोलापूर : प्रतिनिधी
लातूरमध्ये असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासोबत तेथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव लवकर सादर करावा, असा आदेश शिक्षणमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिला आहे. लातूर जिल्ह्यापेक्षा लोकसंख्येने मोठे असलेल्या सोलापुरात शासकीय तंत्रनिकेतनसोबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय का सुरु होत नाही, असा सवाल सोलापूरच्या विद्यार्थीवर्गामधून व शैक्षणिक वर्तुळामधून केला जात आहे. 

लातूरमधील पुरणमल शासकीय तंत्रनिकेतन बंद करुन त्याऐवजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यात येणार होते तसेच लातूरमधील शासकीय तंत्रनिकेतनचे को-एज्युकेशनमध्ये रुपांतर करण्यात येणार होते. ही दोन्ही तंत्रनिकेतने बंद न करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी लातूरचे पालकमंत्री संभाजी निलंगेकर व माजी खा. रुपा पाटील-निलंगेकर यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली होती. या मागणीला यश आले असून शिक्षणमंत्र्यांनी मुलींचे शासकीय तंत्रनिकेतन  व पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन बंद न करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले आहेय.

सोलापूर जिल्हा लातूरपेक्षा मोठा आहे. येथील लोकसंख्या लातूर जिल्ह्यापेक्षा मोठी आहे. तरीदेखील सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास आजपर्यंत मंजूरी मिळाली नाही. तंत्रनिकेतन पाहिजे का अभियांत्रिकी महाविद्यालय पाहिजे, अशी सौदेबाजीसुध्दा अनेकवेळा करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2016 साली राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करुन त्याजागी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा सरकारने प्रयत्न केला. त्याला श्रेणीवर्धन असे गोंडस नाव देण्यात आले होते.

लातूरमधील या संस्था बंद पडल्यास लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेकांना तंत्रशिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ही बाब निदर्शनास आणून देत लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर व माजी खासदार रूपाताई पाटील-निलंगेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन दिले होते. 

या निवेदनाद्वारे या दोन्ही संस्था चालू ठेऊन नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वेगळे सुरू करावे, अशी मागणी करून त्याकरीता आवश्यक असलेली जमीनही शहर व परिसरात उपलब्ध असल्याचे सांगितले होते. लातूर जिल्हा व मराठवाड्यातील तरुण-तरुणींसाठी ही दोन्ही महाविद्यालये गरजेचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी ही महाविद्यालये पूर्ववत सुरू ठेवावीत असे सांगून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी वेगळा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असा आदेश प्रधान सचिवांना दिला आहे. 

सोलापुरातील गोरगरीब व उच्च गुणांनी दहावी उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचा लोंढा शहरामधील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निककडे असतो.परंतु श्रेणीवर्धनाच्या गोंडस नावाखाली सोलापुरातील तंत्रनिकेतनचा डाव खेळला जात आहे. विद्यार्थी व पालकवर्गातून विरोध होताच एक वर्षासाठी तंत्रनिकेतनची मुदत वाढविली जाते.

असा खेळ सोलापूरच्या तंत्रनिकेतनसोबत गेल्या दोन वर्षांपासून केला जात आहे. परंतु अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेचे घोंगडे अद्याप भिजत ठेवण्यात आले आहे.