Wed, Jul 17, 2019 11:58होमपेज › Solapur › जलसंधारणाची कामे अंतिम टप्प्यात 

जलसंधारणाची कामे अंतिम टप्प्यात 

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 8:34PMसोलापूर : महेश पांढरे

अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने सध्या राज्यात सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील काही गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची मोठ मोठी कामे सुरू आहेत. त्यामुळे पडणार्‍या पावसाचे पाणी अडवून धरण्यासाठी जमिनीवर शास्त्रतशुद्ध पद्धतीने अनेक उपाय करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या गावात ही कामे झाली आहेत, त्या गावातील पावसाळ्यातील पाणीसाठा आता तिपटीने वाढणार आहे.

वॉटर कप स्पर्धेंतर्गत तालुक्यातील वडाळा, गावडी दारफळ, रानमसले, कोंडी, गुळवंची, पडसाळी, बाणेगाव, खेड या गावांमध्ये जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याठिकाणी ओढा सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण तसेच बंधार्‍यातील गाळ काढणे, पाझर तलावातील गाळ काढणे, तसेच माळरानावरील पाणी वाहून जाऊ नये यासाठी त्याठिकाणी समतल चर घेणे, डीप सीसीटी करणे, विहिरींचे पुनर्भरण करणे, बांध बंदिस्तीकरणाची प्रचंड कामे सुरु आहेत. 

या कामी तालुक्यातील विविध गावांना भारतीय जैन संघटना, बालाजी अमाईन्स तसेच अनेक मोठ मोठ्या कंपन्यांच्यावतीने पोकलेन आणि जेसीबी मशीनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पूर्वी अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची साठवण क्षमता आता दुपटीने नाही, तर तिपटीने वाढणार आहे. पाण्याच्या साठवणुकीसाठी ज्याप्रमाणे विविध प्रकारची भांडी तयार करून त्यामध्ये पाणी साठवले जाते, अगदी त्या प्रमाणेच पाणी फाऊंडेशनच्या वतीने जलसंधारणाची कामे केली जातात, यामध्ये सीसीटी, डीपीसीसीटी, एलबीएस बंधारा, माती बांध आणि समतल चर घेवून पावसात पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरवून भूगर्भातील पाणी पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. तर ओढा खोलीकरण, सरळीकरण, बांध बंदिस्ती, गावतळी, सिमेंट बंधारे यामधील गाळ काढून त्यामधील पाणीसाठा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विविध गावात पाणी साठवणुकीसाठीची भांडी तयार असून प्रतीक्षा पावसाची आहे.

22 मे पर्यंत चालणार श्रमदान

वॉटर कप स्पर्धेची कामे येत्या 22 मे पर्यंत चालणार आहेत. तसेच अनेक गावांत लोकांचा सहभाग वाढतच चालला आहे. तर दुसरीकडे कंपन्याकडून इंधनासाठी गावकर्‍यांना मदत केली जात आहे. त्यामुळे आणखी काही गावांतही जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. याचा फायदा गावकर्‍यांना नक्की होणार आहे.

Tags : Solapur, Last, phase, water, conservation, works