होमपेज › Solapur › अबब..! जवळगाव कॅनॉलला 27 वर्षांपासून गळती

अबब..! जवळगाव कॅनॉलला 27 वर्षांपासून गळती

Published On: May 11 2018 12:46AM | Last Updated: May 10 2018 11:59PMवैराग : आनंदकुमार डुरे

पूर्वीच्या पिढीच्या पुण्याईवर इतके दिवस पाण्याबाबतीत सुखीसमाधानाने जीवन व्यतीत झाले. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून पाण्याच्या उपलब्धतेचा विचार न करता मनमानेल तसा पाण्याचा उपसा केल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यावर उपाययोजना आणि पाणी अडवून  जमिनीत पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी या उद्देशाने   बार्शी तालुक्यात सध्या पाणी बचतीचे उधाण आले आहे. लाखो हात पाण्याचा थेंबन् थेंब वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या कॅनॉलमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे वाया जाणारे पाणी त्वरित थांबवावे व त्यानंतरच पाणी सोडावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेने केली आहे.

पाणी अविरत वाया
एक बाजूने पाण्याच्या थेंबाथेंबासाठी शासन करोडो रुपये खर्च करून पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. दुसर्‍या बाजूने शासनाचाच एक भाग असलेल्या जलसंपदा विभागाकडून मात्र अनमोल पाणी वाया घालवून शासनाच्याच उद्देशाला काळीमा फासला जात आहे. हा अजब प्रकार जवळगाव (ता. बार्शी ) मध्यम प्रकल्पाच्या कॅनॉलमधून सुरू आहे. यावर्षाच्या पहिल्या आवर्तनातून उपयोगापेक्षा पाणी वाया जास्त गेले. आता दुसर्‍या आवर्तनाची तयारी सुरू केली आहे. बार्शी तालुक्यातील 26 गावांसाठी जवळगाव मध्यम प्रकल्प वरदान ठरला आहे. मात्र पावसाचे घटते प्रमाण आणि पाणी अधिग्रहण क्षेत्रात झालेले लहान-मोठे प्रकल्प यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने दरवर्षी भरणे अशक्यच बनले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने गेल्या सत्तावीस वर्षांत तीन वेळाच धरण भरले आहे. त्यात बार्शी तालुक्यात दर तीन-चार वर्षांनंतर चांगला पाऊस पडतो, असा इतिहास आहे. त्यामुळे जवळगाव धरणात साठलेले पाणी जपून वापरणे काळाची गरज बनली आहे.
पाणी वापर संस्थांची मान्यता रद्द

सध्या रब्बी पिकांसाठी दुसर्‍यांदा पाणी सोडण्यात येणार आहे. अवघ्या काही अल्प टक्के खातेदारांच्या मागणीवरून जलसंपदा विभागाने पाणी सोडले आहे. प्रत्यक्षात पाणी वापर संस्था अथवा पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांनी पाणी मागणी करणे महत्त्वाचे असते. पण इथे पाणी वापर संस्थाची मान्यताच रद्द झाली असून मागणीही अत्यल्प असताना पाणी सोडण्याचे वरून आदेश आल्याचे त्यांच्याच खात्याचे अधिकारी सांगतात. पूर्वी निकृष्ठ दर्जाचे झालेले काम आणि सध्या झालेली मोडतोड यामुळे  चक्क  दोन  ठिकाणी तीनदा कॅनॉल फुटला आहे. याशिवाय गळतीमुळे या पाण्याचा उपयोग होण्यापेक्षा वायाच जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यात कॅनॉलची गळती मोठ्या प्रमाणावर आजही कायम असून पाणी वापरापेक्षा वेस्टेजच अधिक होत आहे. दुष्काळाच्या आठवणी जवळगाव ते कौठाळी असा सुमारे 31 किलोमीटर लांबीचा हा कॅनॉल 1972-73 च्या दुष्काळात तयार करण्यात आला.

त्यानंतर धरण बांधून झाले. विशेष म्हणजे गेल्या 26 वर्षांत एकदाही कॅनॉलच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विनागळती पाणी पोहोचले नाही. 1994-95 पासून कॅनॉलद्वारे  पाणी  सिंचनासाठी उपलब्ध होऊ लागले. तेव्हापासून आजपर्यंत पाणी वापर संस्थांसहित शेतकर्‍यांची सुमारे सतरा लाख रुपयांची थकबाकी आहे.कॅनॉलवरून सुमारे 13 गावांतील तीन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा पाऊस चांगला झाल्याने नदी, विहिरीतील पाणी आतापर्यंत होते. इथून पुढे सिंचनासाठी पाणी हवे असल्यास मागणी नोंदवावी लागते, पण मागणी अत्यल्पच आहे. तरीदेखील पाणी सोडण्यात आले आहे. हे सोडलेले पाणी गळतीमुळे शेतीला कमी आणि वायफळच जास्त जात आहे. 
गळती थांबविण्याची गरज पाणी वाया घालवण्यापेक्षा कडक उन्हाळ्यात हे पाणी उपयोगी कसे पडेल यादृष्टीने नियोजन झाले पाहिजे. पिके सध्या कमी पण चांगल्या स्थितीत असल्याने शेतकर्‍यांची मागणी कमी आहे. मग  कॅनॉलला मोठ्या प्रमाणावर गळती असताना जलसंपदा विभाग पाणी सोडण्याचा अट्टाहास का करीत आहे, असा प्रश्‍न पडला आहे.