Tue, Apr 23, 2019 01:37होमपेज › Solapur › जमीन हस्तांतरण शंभर रुपयात

जमीन हस्तांतरण शंभर रुपयात

Published On: Aug 10 2018 11:56PM | Last Updated: Aug 10 2018 10:53PMसोलापूर : महेश पांढरे 

महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार एका कुटुंबातील रक्‍त नात्यामध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी आता मुद्रांक शुल्क भरण्याची गरज राहणार नसून केवळ शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हे वाटणीपत्र करता येणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक परिपत्रक काढले असून त्यांनी तहसीलदारांना 85 नुसार वाटणीपत्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हिंदू कुटुंंब पध्दतीनुसार एकाच कुटुंबातील लोकांना याचा लाभ होणार आहे.

पूर्वी हे अधिकार तहसीलदारांना होते. त्यानंतर महसूल अधिनियमामध्ये काहीअंशी बदल करण्यात आला होता तसेच शासनाचा महसूल बुडू नये यासाठी नव्याने आदेश पारित करण्यात आले होते. त्यामुळे कलम 85 नुसार वाटणीपत्र करण्यामध्ये काही लोकांत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. याचा फटका सर्वसामान्य शेतकर्‍यांना बसत होता. त्यामुळे वडिलांची जमीन मुलांच्या नावावर करण्यासाठीही मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ येत होती. यासाठी तहसीलदारांना स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी अनेक तालुक्यांतून येत होती. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासाठी स्पष्ट आदेश काढले असून हिंदू कुटुंंब पध्दतीनुसार वडिलांची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना व गट विभाजन करत असताना अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना अधिकार असून त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती हे अधिकृत वाटणीपत्र आणि गट विभाजन करून देण्यास कसलीच हरकत नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे  कलम 85 नुसार येणारी प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी भोसले यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यामुळे आता एकाच कुटुंबात जमीन हस्तांतरण करायची असेल अथवा गट विभाजन करून घ्यायचे असेल तर त्यासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची वेळ येणार नाही, तर ते काम केवळ शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती होणार आहे.

आ. बबनदादा शिंदे यांचा यासाठी पाठपुरावा
अधिनियम 85 नुसार भावाभावांतील वाटणीपत्र करुन मिळावे यासाठी मूळ कायद्याचा अभ्यास करून तहसीलदारांना तशा सूचना द्याव्यात यासाठी आ. बबनदादा शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच तहसीलदारांना तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.

आता मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही ः जिल्हाधिकारी 
महसूल अधिनियम 85 नुसार वाटणीपत्राचे अधिकार तहसीलदारांना होते. मात्र यामध्ये वारंवार बदल झाल्याने काही ठिकाणी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी मुद्रांक शुल्क भरून हे वाटणीपत्र केले जात होते. मात्र हिंदू कुटुंब पद्धतीनुसार आणि मूळ कायद्यानुसार मुद्रांक शुल्काची गरज नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.