Mon, May 20, 2019 20:38होमपेज › Solapur › 7 महामार्गांचे भूसंपादन रखडले

7 महामार्गांचे भूसंपादन रखडले

Published On: Sep 08 2018 1:34AM | Last Updated: Sep 07 2018 10:29PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या 13 प्रकल्पांपैकी जवळपास 7 प्रकल्पांसाठी 102 गावांतील 388 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी लागणार्‍या 602 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘भारत जोडो’ या अभियानाला सोलापूर जिल्ह्यात बे्रक मिळाल्याचे दिसून येत आहे.

शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यांना जोडण्यासाठी 13 राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहेत. त्याची रितसर घोषणा केंद्रीय परिवहन व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. तसेच येत्या तीन वर्षांत या महामार्गांचे काम अंतिम टप्प्यात येईल, असा विश्‍वासही गडकरी यांनी व्यक्त केला होता. मात्र या 13 पैकी सात महामार्गांसाठी अद्यापही जमीन भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झालेली नाही. यामध्ये कुर्डुवाडी-पंढरपूर महामार्ग क्र.965 या रस्त्यासाठी 14 गावांतून 48 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 7.93 हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे. 

पंढरपूर-सांगोला महामार्ग क्र.204 साठी 6 गावातून जाणार्‍या 31 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 7.33 हेक्टरचे भूसंपादन होणार आहे. म्हसवड-पिलीव- पंढरपूर या महामार्गासाठी 8 गावातील 42 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 14.8 हेक्टर भूसंपादन होणार आहे. तर म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभुर्णी या महामार्गासाठी 10 गावांतील 58 किलोमीटरसाठी 18 हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे. 

अहमदनगर-करमाळा-टेंभुर्णी या 59 किलोमीटरच्या महामार्गासाठी 18 गावांतील 121 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 संत ज्ञानेश्‍वर पालखी मार्गाच्या 115 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 39 गावातील 344 हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन होणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या 35 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 7 गावातील जवळपास 94 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. यासाठी नुकतीच राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उर्वरित क्षेत्राचे तात्काळ भूसंपादन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. परंतु, या सूचनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. 

616 हेक्टरच्या भूसंपादनापोटी 445 कोटींचे वाटप
सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या 13 पैकी सात महामार्गाच्या भूसंपादनाचे काम रखडले असले तरी सहा प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या 616 हेक्टरसाठी 445.53 कोटी रुपयांचा मोबदला शेतकर्‍यांना वाटप करण्यात आला असून उर्वरित रक्कमदेखील काही दिवसांत शेतकर्‍यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.