Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Solapur › परिवहनप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्यावर लाल बावटा ठाम

परिवहनप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्यावर लाल बावटा ठाम

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:38AMसोलापूर : प्रतिनिधी

महापालिका परिवहन कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याच्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस खाते सतर्क झाले आहे. गरुवारी लाल बावटा युनियनच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्‍वासन देत आंदोलन न करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शुक्रवारी नक्‍की काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या 18 दिवसांपासून परिवहन कर्मचारी थकीत नऊ महिन्यांचे वेतन व अन्य मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. शुक्रवारी (दि. 27) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौर्‍यावर येणार आहेत. या दौर्‍यावेळी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू, असा इशारा महापालिका परिवहन कर्मचारी युनियनने मंगळवारी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर पोलिस खाते सतर्क झाले आहे. 

गुरुवारी लाल बावटा युनियनने मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याबाबत व्यूहरचना आखण्यासाठी दत्तनगर येथील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कामगार नेते नरसय्या आडम, युनियनचे अध्यक्ष व्यंकटेश कोंगारी, सचिव सिद्धप्पा कलशेट्टी यांच्यासह सुमारे 300 कामगार उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याचा ठाम निर्धार करण्यात आला. या बैठकीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचार्‍यांनी याबाबतची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांना दिली. यावर लगेचच पोलिस आयुक्तांनी  युनियनच्या पदाधिकार्‍यांना बोलावून घेतले. आंदोलन करु नये अशी विनंती करीत आयुक्तांनी याप्रश्‍नी युनियनच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांसमवेत पाच मिनिटे भेट घडवून आणण्याचे आश्‍वासन दिले.

यासंदर्भात बोलताना युनियनचे सचिव कलशेट्टी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी युनियनला मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्‍वासन दिले आहे. जरी ही भेट घडवून आणली नाही तर आम्हाला गनिमी काव्याने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.


Tags : Lal Bawata Union, Chief Minister,Devendra Fadnavis, Transport Issue, Solapur