Sun, Aug 25, 2019 19:00होमपेज › Solapur › महिलांसाठी ‘लेडीज आरपीएफ’ तैनात

महिलांसाठी ‘लेडीज आरपीएफ’ तैनात

Published On: May 07 2018 11:57PM | Last Updated: May 07 2018 11:48PMसोलापूर : प्रतिनिधी

रेल्वे प्रवासादरम्यान महिलांवर होणार्‍या अत्याचारावर सुरक्षेचे उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर मध्य रेल्वे डिव्हिजनमध्ये आरपीएफ महिला सुरक्षारक्षक दाखल झाले आहे, तसेच 182 टोल फ्री क्र. सेवेत रुजू करण्यात आला आहे. महिला सुरक्षेसाठी अँड्रॉईड अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे.

मंगळवारी सकाळी आरपीएफ सुरक्षा आयुक्त जयण्णा कृपाकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली. रेल्वेमध्ये प्रवासदरम्यान महिलांवर वाढते अत्याचार व त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाकडून सोलापूर डिव्हिजनमध्ये दहा महिला आरपीएफ कॉन्स्टेबल दाखल झाले आहेत. सोलापूर डिव्हिजनमध्ये महिलांना प्रवासदरम्यान समाजकंटकांकडून  काही त्रास होत असल्यास किंवा छेडछाडीचे प्रकार होत असल्यास अँड्रॉईड अ‍ॅपच्या  माध्यमातून  ताबडतोब  तक्रार दाखल करू शकता व तसेच 182 या टोल फ्री क्रमांकावरून संपर्क साधून आरपीएफची मदत घेऊ शकता, अशी माहिती आरपीएफ प्रशासनाकडून देण्यात आली.

आरपीएफने ऑपरेशन मुस्कानअंतर्गत जानेवारी ते मार्चपर्यंत 30 मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले व काही मुला-मुलींचे पुनर्वसन केले. रेल्वेमध्ये व स्थानकात हरवलेल्या लहान मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानमधून मोठी मदत झाली आहे.
महिला व बालकल्याण मंत्रालया अंतर्गत रेल्वेस्थानकांवर चाईल्ड लाईन हेल्प सेंटर सुरू केले जाणार आहे. सोलापूर विभागातील सोलापूर व गुलबर्गा या स्थानकांवर चाईल्ड हेल्प सेंटर सुरु केले जाणार आहे.त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.