Sun, Apr 21, 2019 03:54होमपेज › Solapur › तुळजाभवानीच्या चैत्री यात्रेत पूर्वनियोजनाचा अभाव

तुळजाभवानीच्या चैत्री यात्रेत पूर्वनियोजनाचा अभाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

तुळजापूर : संजय कुलकर्णी

31 मार्च रोजी तुळजापूरनगरीत महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत असताना प्रशासकीय यंत्रणा थंड असल्याने भाविकांना विविध संकटाना तोंड द्यावे लागणार आहे.

तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचल्याने जो-तो होरपळून निघत आहे. शेतातील रब्बी पिकांची काढणी-मळणीची कामे आटोपून कुटुंबासह कुलदेवतांच्या दर्शनाला बाहेर पडणारे श्रध्दाळू चैत्री पौर्णिमेला लाखोंच्या संख्येने हजेरी लावतात. चैत्री एकादशीला शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे दर्शन, पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्माईचे दर्शन घेऊन श्रध्दाळू कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला जातात. चैत्र पौर्णिमेला तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापुरात हजेरी लावतात. चैत्री मातेच्या सोहळ्याला रामनवमीपासूनच सुरुवात झाली असून तापलेल्या उन्हाच्या पार्‍याची तमा न बाळगता भाविक उत्साहात व भक्‍तिभावाने काठ्या, कावड्यांसह येथे दाखल होत आहेत.

सावलीसाठी नियोजन नाही

उन्हाच्या चटक्याने देवीचे भाविक हैराण झालेले असताना मंदिर संस्थानने मंदिराच्या दोन्ही महाद्वारात व परिसरात कापडी मंडप उभारून भाविकांची उन्हापासून सुटका केलेली नाही. भाविकांना मंदिरात जाण्यापूर्वी प्रवेश पास घेणे बंधनकारक असल्याने पादत्राणे सोडण्याची सोय मोफत नसल्याने लाखो भाविक मातेच्या महाद्वारात बेवारस पादत्राणे सोडून मंदिरात जातात आणि दर्शन घेऊन येईपर्यंत या पादत्राणाची चोरी होत असल्याने अनवाणी पायाने उन्हाचे चटके सोसत वाहन पार्किंग, पुजार्‍याचे घर किंवा इच्छित स्थळ गाठावे लागत आहे. त्यासाठी मंदिर संस्थानने डोक्यावर कापडी छत व रस्त्यावर मॅट अंथरुणाची गरज आहे.

भाविक सुविधांपासून वंचित

मंदिर संस्थानने पेड दर्शनाची सुविधा सुरू करून भाविकांच्या खिशाला झळ देत दररोज लाखो रुपयांची कमाई सुरू केली. त्याबदल्यात कसल्याही सोयी-सुविधा संस्थानकडून पुरविल्या जात नसल्याने भाविकांतून संताप व्यक्‍त होत आहे. दर्शन रांगेत स्वच्छतेचा अभाव, शुद्ध पिण्याचे थंड पाणी नाही, स्वच्छतागृहाची सुविधा धड नाही, भाविकांना संस्थानकडून सवलतीच्या दरात राहण्याची व उतरण्याची सोय नाही, मोफत प्रसाद नाही, औषधोपचाराची सुविधा नाही. केवळ भाविकांना पैसे घेऊन अल्प वेळात तेही 10 ते 15 फूट अंतरावरून मातेचे दर्शन दिले जाते.

स्नानाची सुविधा नाही

शारदीय नवरात्र महोत्सवात बीडकर तलावा (प्रति कल्लोळ) मध्ये पाणी सोडून 10 ते 20 रुपये आकारणी करून भाविकांची स्नानाची सोय केली जाते. एरव्ही भाविकांना स्नानासाठी व इतर विधीसाठी लॉजवर किंवा पुजार्‍याच्या घरी जावे लागते. भाविकांकरिता मंदिर संस्थानने कायमस्वरुपी स्नानाची सोय करण्याची गरज आहे. प्राचीन कल्लोळ व गोमुख तीर्थकुंडाचा कायापालट केल्यास ही अडचण दूर करता येऊ शकते. मात्र पेडदर्शन व्यवस्थेच्या नावाखाली पैसा कमावणार्‍या संस्थानाला या बाबीचा विसर पडला आहे. केवळ स्नानासाठी लाखो भाविकांचे हजारो रुपये खर्च होतात, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

अतिक्रमणाने रस्ते झाले छोटे

तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांतर्गत अनेक रस्ते मोठे झाले खरे, मात्र छोट्या व्यावसायिकांनी फुटपाथसह अर्धेरस्ते काबीज केल्याने भाविकांचा श्‍वास गुदमरतो आहे. मोठ्या रस्त्यावर बेशिस्त चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळेही रस्ते व्यापून जात आहेत. तुळजापुरात गेल्या काही वर्षात शेकडो भक्‍त निवास व लॉजिंगची निर्मिती झाली. मात्र त्यांच्याकडे वाहन पार्किंगच्या सोयी नसल्याने तेथे उतरणारे पर्यटक, यात्रेकरू चक्‍क रस्त्यावर वाहन पार्किंग करतात. याला पोलिस प्रशासन व न. प. प्रशासनाचे पाठबळ आहे.

मंदिर परिसरात फेरीवाल्यांचा उपद्व्याप

महाद्वारात छोटे व्यवसाय करून उपजीविका करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. या फेरीवाल्यांना कायमस्वरुपी जागा नसल्याने ते चक्क रस्त्यावर ठिय्या मांडून व्यवसाय करतात. मंदिर परिसरात दुचाकीच्या बेशिस्त पार्कींगमुळेही भाविकांची गैरसोय होत आहे. याशिवाय घंटागाड्या सुरू होवूनही कचर्‍याचे ढीग कमी झालेले नाहीत. त्यावर चरणारे मोकाट जनावरे, दुर्गंधी, उघड्यावर मांस विक्री अशा एक ना अनेक समस्या प्रशासनाने सोडविण्याची गरज आहे.

बसस्थानकाचा परिसर धुळीने माखलेला

तुळजापूर तीर्थक्षेत्रात राज्य परिवहन महामंडळाची दोन बसस्थानके अस्तित्वात आहेत. प्रवाशांची वर्दळ व वाहतुकीची ये-जा जुन्या बसस्थानकावर जास्त आहे. मात्र परिवहन महामंडळ जुन्या बसस्थानकाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष करीत असल्याने कित्येक वर्षांपासून प्रवाशांना धुळीच्या सानिध्यात व शौचालय-मुतार्‍यांच्या दुर्गंधित वावरत प्रवास करावा लागत आहे. जुन्या स्थानकाचा परिसर पूर्ण उखडला असून याठिकाणी धुळीने साम्राज्य आहे.

स्थानकावरील धुळीमुळे प्रवाशांना श्‍वसनाचा त्रास होत आहे. परिसरात अपुरा विद्युत प्रकाश स्थानकावरील सुलभ शौचालय व मुतार्‍यांमध्ये पाण्याच्या कमी वापरामुळे सर्वदूर दुर्गंधी पसरत आहे. येथील स्वच्छतागृहात महिलांकडे पैशाची मागणी केली जात असल्याने महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा तुळजापूर बसस्थानकाचा कायापालट होईल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसे झाले नाही. तथा पालकमंत्र्यांनी तर अद्याप तुळजापूर एंट्री केेलेली नाही. सध्या उन्हाचा पारा चढलेला असताना दोन्ही बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. सामान्य प्रवाशाला स्थानकावर पाणी मिळणे कठीण झाले आहे. स्थानकावर वेड्यांसह वारांगणाचा वावर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दररोज शेकडो बसच्या फेर्‍यातून हजारो प्रवाशांची ने आण करणार्‍या जुन्या बसस्थानकाच्या विकासाकडे एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे दुर्लक्ष होत आहे. स्थानकात पोलिस चौकी नसल्याने प्रवाशांसह त्यांच्या सन्मानाची सुरक्षा रामभरोसे आहे.

Tags : Solapur, Solapur News, Lack, pre planning, TuljaBhavani, Chaitra yatra


  •