कुर्डुवाडी : प्रतिनिधी
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या हाणामारीचा राग मनात धरून 15-16 जणांनी एका युवकाचा तलवार, गुप्ती, चॉपरने वार करून खून केला. ही घटना कुर्डुवाडी शहरातील बायपास रस्त्यावर दुपारी पाऊनच्या सुमारास घडली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांत फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृत युवक माळशिरसचा आहे. विकी गायकवाड (वय 24, रा. माळशिरस) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सायंकाळी उशिरापर्यंत मृताचे शवविच्छेदन झाले नव्हते. फिर्याद दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
एप्रिल महिन्यात माने व श्रीरामे गटात हाणामारी झाली होती. यातील माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जुन यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी माजी नगरसेवक अमर माने, अश्पाक शेख, विकी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. गायकवाड याला जामीन मिळाल्याने तो हजेरीसाठी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात येत होता. रविवारीही सकाळी गायकवाड पोलिस ठाण्यात हजेरी देऊन प्रा. आशिष रजपूत यांच्या गाडीतून बायपास मार्गे जात असताना तेथे दबा धरुन बसलेल्या 15 ते 16 जणांनी गायकवाड याला गाडीतून उतरवून त्याच्यावर तलवार, गुप्ती, चॉपरने वार केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच गायकवाडला कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेथे डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषीत केले.
एप्रिल महिन्यात कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीतच अमर माने व माणिक श्रीरामे यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जून याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात माणिक श्रीरामे गंभिरित्या जखमी झाले होते. विकी गायकवाड हा अमर माने याचा मावस मेव्हणा आहे.
विकी गायकवाड स्पर्धा परिक्षेचा विद्यार्थी माणिक श्रीरामे याच्यावर हल्ल्ला केल्याप्रकरणी विकी गायकवाड याला अटक करण्यात आली होती. मात्र गायकवाड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परिक्षार्थी विद्यार्थी असल्याने न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. तो नियमीतपणे कुर्डूवाडी पोलिस ठाण्याला हजेरी देण्यासाठी येत होता.
विकी गायकवाड स्पर्धा परिक्षेचा विद्यार्थी
कुर्डूवाडीत खूनाची घटना घडल्यानंतर कुर्डूवाडीसह माढा, मोहोळ येथून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते.दुपारपासून ग्रामीण रुग्णालयाबाहेर नातेवाईकांची गर्दी होती. तर रुग्णालय परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. माढा पोलिस कोठडीतून अमर माने यांना आणण्यात येणार होते. त्याच्या प्रतिक्षेत सर्वजण होते.