होमपेज › Solapur › बार्शी रस्त्यावर चक्काजामची मालिका

बार्शी रस्त्यावर चक्काजामची मालिका

Published On: Jul 28 2018 11:00PM | Last Updated: Jul 28 2018 9:52PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

माढा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने शनिवारी ‘गाव तेथे चक्काजाम’ आंदोलन आयोजित केले होते. कुर्डुवाडी, माढा, मोडनिंब, टेभुर्णी आदी शहरांना जोडणार्‍या सर्वच रस्त्यांवर प्रत्येक गावागावांत मराठा ठोक मोर्चाने चक्काजाम आंदोलन केले.

कुर्डुवाडी बार्शी रोडवर म्हैसगाव, चिंचगाव, भोसरे येथे अनुक्रमे एक एक तासाचे चक्काजाम आंदोलन केले. यावेळी हजारो मराठे रस्त्यावर उतरुन सरकारविरोधी घोषणा देत होते. माढा तालुक्यात सत्ताधारी मंत्री, खासदार आल्यास त्यांना तालुक्यात कोठेही पाय ठेवू देणार नाही, असा इशारा मराठा ठोक मोर्चाचे समनवयक हर्षल बागल यांनी दिला आहे.

माढा तालुक्यातील भोसरे, म्हैसगाव, चिंचगाव, लऊळ, बारलोणी, अंबाड येथे मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन यशस्वी झाले. कुर्डुवाडी-बार्शी रोडवर पोलिसांनी विशेष तगडा  पोलिस बंदोबस्त लावला होता. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी कायदा सुव्यवस्थेचा मान राखत शांततेत आंदोलन केल्यामुळे चक्काजाम अतिशय शांततेत पार पडले. यावेळी आंदोलनात वारकर्‍यांनी भारुड व भजन म्हणत मराठा आंदोलनाला पाठिंबा दाखवला. 

या आंदोलनाला समन्वयक हर्षल बागल, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वामनभाऊ उबाळे, स्वाभिमानीचे नेते शिवाजी पाटील, जि.प. सदस्य आप्पासाहेब उबाळे, पं.स. सदस्य सुरेश बागल, तडवळेचे सरपंच धनंजय परबत, म्हैसगावचे सरपंच पंडित खारे,  आप्पासाहेब बोरकर, सचिन बागल,   गणेश बागल, आशिष रजपूत, अल्ताफ मुलाणी, गोरख उबाळे, वैभव बागल, रविराज बागल, राम बागल, अंकुश बागल, शहाजी पाटील,  युवराज बागल, तुषार हाके, सौरभ भोसले, कृष्णा गवळी, प्रशांत बागल, मिटू उबाळे, विकास जगताप, अतुल चोपडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान सरकारविरोधात मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा आंदोलक देत होते. एकवेळ सत्ताधार्‍यांवर हल्ले करा पण एसटीची तोडफोड व जाळपोळ करु नका, असे आवाहन समन्वयक हर्षल बागल यांनी केले. यावेळी धनगर, दलित, माळी, मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीदेखील मराठा आंदोलनाला पाठिंबा देत आरक्षणाचे समर्थन केले. 

 निकषावर आरक्षणाला विरोध

सध्या सरकार बैठका घेऊन मोर्चात फूट पाडण्यासाठी आणि मराठाविरोधी इतर जाती भडकवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचत आहे. मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण नको आहे. अशा आरक्षणाला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि इतर जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीत द्यावे ही मागणी केली आहे. जाती-धर्मात वाद लावायचे हे षड्यंत्र हाणून पाडा, असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले आहे.