Thu, Jul 18, 2019 00:53होमपेज › Solapur › श्रेयवादात अडकला कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपचा प्रश्‍न

श्रेयवादात अडकला कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपचा प्रश्‍न

Published On: Mar 02 2018 12:50AM | Last Updated: Mar 01 2018 10:50PMकुर्डुवाडी : विनायक पाटील

‘अर्थसंकल्प झाल्यावर आठवतो कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपचा प्रश्‍न’ ही मानसिकता सर्वच पक्षांच्या नेत्यांची झाली आहे. रेल्वेमंत्र्यांना केवळ निवेदन देऊन श्रेयवाद लाटण्याचे प्रकार सुरु आहेत. या प्रश्‍नासाठी संघटीत प्रयत्न गरजेचा आहे. मात्र त्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही.

कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपसाठी पॅसेंजर डब्यांचे काम मिळावे, त्यासाठी जागेसह सर्व सोईसुविधा असल्याची मागणी आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधींनी दमदारपणे मांडली नाही. केवळ रेल्वे मंत्रालयच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांमार्फतही या प्रश्‍नाला गती मिळू शकते. तरीही दोन्हीकडे नियोजनबध्द पध्दतीने पाठपुरावा कधी झालाच नाही. त्यामुळे वर्कशॉपचा सहज सुटणारा प्रश्‍न रेंगाळत पडल्याचे दिसून येत आहे. निवेदन देऊन फोटो काढणे आणि माध्यमांना पोहोच करणे या कामात मात्र लोकप्रतिनिधींनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. एकाने वर्कशॉप प्रश्‍नाचा मुद्दा उचलला की सर्वांनाच या प्रश्‍नाची आठवण होऊ लागते आणि श्रेयवाद उफाळून येतो.

कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपला कोच पुनर्निर्माणाचा प्रकल्प मिळावा, ही जनतेची मागणी मुंबई व दिल्ली दरबारी जोरदारपणे मांडली जात नाही. किंबहुना या मागणीला जिल्ह्यातील नेत्यांकडून सांघिक प्रयत्न होत नाहीत. 1930 पासून वाफेवरील इंजिन दुरुस्ती, नॅरोगेज, ब्रॉडगेज वॅगन व बोगींची दुरुस्तीचा अनुभव असलेले कुर्डुवाडीचे वर्कशॉप कुशल कामासाठी देशभरात प्रसिध्द आहे. याचा अभिमान केवळ माढा तालुकावासियांनाच नव्हे तर समस्त सोलापूरकरांनाही असणे गरजेचे आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ व दक्षिण भारतातील वारकरी कुर्डुवाडीच्या नामदेव पायरीवर विसावूनच पुढे तीर्थक्षेत्र पंढरीकडे मार्गस्थ होतात.

त्यामुळे कुर्डुवाडी जंक्शन हे भारतीय रेल्वेतील महत्त्वाचे केंद्र मानले गेले आहे. असे असताना रेल्वेचे महत्त्वाचे विषय लोकप्रतिनिधींकडून नेहमीच दुर्लक्षित राहतात, याचे आश्‍चर्य वाटते. वास्तविक यंदाच्या अर्थसंकल्पात वर्कशॉपच्या उर्जितावस्थेला मोठी संधी होती.

परेल येथील वर्कशॉप बंद करण्यात आल्याने त्याठिकाणचे कोच निर्मितीचे अधिकतर काम कुर्डुवाडीला मिळण्यास सोलापुरातील दोन्ही भाजपच्या मंत्र्यांसह सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ जनतेच्या समाधानासाठी निवेदनाचे फोटो सेशन न करता, वर्कशॉपच्या प्रश्‍नावर रेल्वेमंत्री, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा घडवून आणणे आवश्यक झाले आहे.