Sat, Jun 06, 2020 19:49होमपेज › Solapur › ऑनलाईन परवाना; कुर्डुवाडी पालिका पहिली

ऑनलाईन परवाना; कुर्डुवाडी पालिका पहिली

Published On: Apr 24 2018 11:26PM | Last Updated: Apr 24 2018 9:51PMकुर्डुवाडी :  विनायक पाटील

शहरात पुढील 15 वर्षांतील संभाव्य विकासकामांबाबत चर्चा करुन कुर्डुवाडी नगरपालिकेत नगरविकासदिन साजरा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात शहरात भुयारी गटारीच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगण्यात आले. ऑनलाईन परवाना देणारी कुर्डुवाडी नगरपालिका जिल्ह्यात पहिली ठरल्याचे जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही सूचना मांडल्या.

नगरविकासदिनानिमित्त नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, मुख्याधिकारी कैलास गावडे यांच्या प्रमुख उपस्थित नगरपालिकेत छोटेखानी बैठक झाली. पुढील 15 वर्षांत शहरातील विकासकामांबाबत मुख्याधिकारी गावडे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. ऑनलाईन बांधकाम परवाना देणारी कुर्डुवाडी नगरपालिका जिल्ह्यात पहिली ठरल्याचे त्यांनी जाहीर केले. ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे नागरिकांचे नगरपालिकेतील हेलपाटे वाचणार आहेत. ठराविक कालावधीत बांधकाम परवाना मिळणे बंधनकारक आहे. या कार्यप्रणालीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात भूमिगत गटार, जलशुध्दीकरण, स्मशानभूमी, शाळा आदींच्या विकासाबाबत नगरपालिकेने आराखडा तयार केल्याचे नगराध्यक्ष मुलाणी यांनी सांगितले. पुढील 15 वर्षांतील विकासाबाबत वास्तुविशारद शरद भोसले यांनी विविध सूचना मांडल्या. नगरपालिकेतील रिक्‍त पदे, निकृष्ट कामे, जलतरण तलाव, डिजिटल बोर्डामुळे शहराचे होणारे विद्रुपीकरण याबाबत मत मांडले. अजित परबत यांनी  नगरपालिकेने ‘प्रशासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवावा, शहरातील पार्किंग व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मांडल्या. कुर्डुवाडी प्रेस क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बागडे यांनी शहरात मैदानाची कमतरता आहे.

जागेच्या अडचणीवर मात करण्यासाठी किमान जलतरण तलावाची सोय करावी, असे सांगितले. शासनाच्या पडिक जागा हस्तांतरित करण्याबाबत पाठपुरावा करावा, स्वच्छता विभागाकडील कचरा गाड्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना केली. पत्रकार इरफान शेख यांनीही मनोगत व्यक्‍त केले. धनंजय डिकोळे यांनी कुर्डुवाडीच्या सर्वांगिण विकासाबाबत कटिबध्द असल्याची ग्वाही दिली. यावेळी नगरसेवक संजय गोरे, आयुब मुलाणी, आनंद टोणपे, अरुण काकडे, उपनगराध्यक्ष, प्रतिनिधी हरिभाऊ बागल, नगरसेवक, प्रतिनिधी संभाजी सातव, चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते.
 

Tags : Kurduvadi, Municipality, Online license, Solaur