Wed, Jul 24, 2019 14:12होमपेज › Solapur › भीमा-कोरेगावमध्ये महिलांचाही विनयभंग

भीमा-कोरेगावमध्ये महिलांचाही विनयभंग

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 10:31PMसोलापूर : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनेत पुरुष, लहान मुलांना मारहाण झाली, शिवाय अनेक महिलांचा विनयभंग करण्यात आला. अशा घटना देशासाठी लांच्छनास्पद असून सरकारने तटस्थपणे याकडे पाहायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष राजा ढाले यांनी केले.

बुधवारी सोलापूर येथे सम्यक विचार मंचतर्फे आयोजित मिलिंद व्याख्यानमालेत व्याख्यान देण्यासाठी ढाले आले होते. यावेळी त्यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकारांशी संवाद साधला. विविध प्रश्‍नांना त्यांनी आक्रमकपणे उत्तरे देत प्रस्थापित व्यवस्थेविरोधात टीकास्त्र सोडले.

ढाले म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यात मी काही दिवसांपूर्वी जाऊन आलो. तेथील काही समाजबांधव सपत्निक भीमा-कोरेगाव येथे अभिवादन करण्यासाठी गेले होते. तेथे समाटकंटकांकडून महिलांचा विनयभंग करण्यात आला.

दलितांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. काँग्रेसच्या काळातही अत्याचार होतच होते. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून वंचितांमध्ये असुरक्षततेची भावना वाढीस लागली आहे. काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष ढोंगी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हीच सन्मान केला, असा दावा भाजप पक्ष करीत असला तरी त्यांनी उपकाराची भाषा करू नये. बाबासाहेब हे मुळचेच मोठे आहेत. भाजपने उगीच वल्गना करू नयेत. 

अ‍ॅट्रॉसिटीचे तीव्र पडसाद

दलितांवर होत असलेल्या अत्याचाराला पायबंद घालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच घटनेमध्ये तरतूद करून ठेवली आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा त्याचेच स्वरुप आहे. या कायद्याला अधिक शिथील करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. हे चुकीचे असून याला होणारा विरोध हा भविष्यात वाढ होत जाऊन याचे तीव्र पडसाद उमटतील, असा इशारा ढाले यांनी यावेळी दिला.

प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले. ढाले यांचे स्वागत श्रमिक पत्रकार संघाचे सचिव उमेश कदम यांनी केले. यावेळी सम्यक विचार मंचचे अध्यक्ष चंद्रकांत कोळेकर, सुधीर चंदनशिवे, शांतीकुमार कांबळे, किरण बनसोडे उपस्थित होते. 

 

Tags : solapur, solapur news, Koregaon Bhima, molesting women, Raja Dhale,