Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Solapur › आयुक्‍तालयामध्ये चाकू घेऊन फिरणार्‍या महिलेस अटक

आयुक्‍तालयामध्ये चाकू घेऊन फिरणार्‍या महिलेस अटक

Published On: May 08 2018 10:40PM | Last Updated: May 08 2018 9:55PMतपासणी होत असतानाही ती महिला चाकू घेऊन आत गेलीच कशी ?
पोलिस आयुक्‍तालयामध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावरील नोंदवहीमध्ये नावनोंदणी करण्यात येते. परंतु प्रवेशद्वारावरील कर्मचार्‍यांकडून व्यक्तींकडील साहित्याची तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळेच ही महिला चाकू घेऊन आयुक्‍तालयामध्ये जाऊ शकली. आयुक्‍तालयाला दोन प्रवेशद्वार आहेत. परंतु एकाच प्रवेशद्वाराचा येण्याजाण्यासाठी वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाच ठिकाणी नेमणुकीस असलेल्या कर्मचार्‍यांनी आयुक्‍तालयात येणार्‍या प्रत्येकाची कसून चौकशी व तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला असता तर ही महिला चाकू घेऊन जाऊच शकली नसती. 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयामध्ये चाकू घेऊन फिरणार्‍या महिलेस पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे जनतेची सुरक्षा करण्याच्या विश्‍वास देणार्‍या पोलिसांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.  सोना संतोष कटकधोंड (वय 27, रा. घर नं. 76, मौलाली चौक, कोंचीकोरवी गल्ली, सोलापूर) असे अटक   करण्यात  आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिला पोलिस शिपाई दीपाली कल्याणराव बोरामणीकर (ब. नं. 1215, नेमणूक- सदर बझार पोलिस ठाणे) या महिला कर्मचार्‍याने  फिर्याद दाखल केली आहे.

सोना कटकधोंड ही महिला सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलिस आयुक्‍तालयामध्ये आली होती. आयुक्‍तालयातील सहायक पोलिस आयुक्‍त कार्यालय विभाग 2 या कार्यालयात येऊन सोना कटकधोंड ही महिला मोठमोठ्याने आरडाओरड करू लागली आणि तिने तिच्याजवळील लोखंडी धारदार प्लास्टिकची मूठ असलेला चाकू दाखवून गोंधळ घालू लागली. त्यामुळे सहायक पोलिस आयुक्‍त कार्यालयातील कर्मचार्‍यांनी याबाबत सदर बझार पोलिसांना कळविले.

सदर  बझार पोलिसांनी घटनास्थळी येऊन सोना कटकधोंड हिला धारदार चाकूनिशी ताब्यात घेऊन सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस आयुक्‍तांच्या आदेशानुसार शहरात  शस्त्रास्त्र बंदी आदेशाचा अंमल सुरू असताना सोना कटकधोंड ही घातक  शस्त्रानिशी  मिळून येऊन शस्त्रास्त्र बंदी आदेशाच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार बोराटे तपास करीत आहेत.