होमपेज › Solapur › कलुबर्मे खून प्रकरण : प्रमुख आरोपी अद्यापही बेपत्ता

कलुबर्मे खून प्रकरण : प्रमुख आरोपी अद्यापही बेपत्ता

Published On: May 07 2018 2:05AM | Last Updated: May 06 2018 10:47PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

फेसबुकवरील कमेंटवरून  झालेल्या भांडणाचा राग मनात धरत शहरातील मुरलीधर चौकात 25 एप्रिल  रोजी सचिन ज्ञानेश्‍वर कलुबर्मे या युवकाचा खून झाला होता. खून होऊन 15 दिवस लोटले तरीही अद्यापही प्रमुख आरोपी बेपत्ताच आहेत. दोन्ही संशयित आरोपी नगरसेवक असून त्यांच्यापर्यंत पोलिसांचे हात कधी पोहोचतात याकडे मंगळवेढेकरांचे लक्ष लागले आहे. 

मंगळवेढा तालुक्यात खळबळ  उडवणार्‍या घटनेला आता दोन आठवडे उलटले आहेत. जखमी असलेल्या प्रदीप पडवळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले प्रशांत यादव आणि पांडुरंग नायकवाडी हे दोन नगरसेवक अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ पथके फिरत आहेत. मात्र, अद्याप कोणताही सुगावा लागला नाही. त्या दोन फरार आरोपींना अटक व्हावी म्हणून मयत कलुबर्मे याच्या कुटुंबीयानी महाराष्ट्र दिनादिवशी पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले. घटनेच्या दुसर्‍या दिवशी  रात्री मुख्य संशयित आरोपी बाबा नायकवाडी यास जत तालुक्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली. विशाल उन्हाळे, धनाजी कराळे, अलीम पटेल यांना तीन दिवस पोलिस कोठडी दिली  आहे. गुन्ह्यात वापरलेली  एक स्विफ्ट कार, एक बोलेरो जीप व एक मोटार सायकल अशी तीन वाहने जप्त केली. 

पंधराजणांची कसून चौकशी

कलुबर्मे कुटुंबीयांचे 4 मे रोजी उपोषण सोडवण्यात आले आणि 20 मेपर्यंत फरार आरोपींना पकडण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी अटकेत असलेल्या सर्वांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या खुनाचा उलगडा झाला असला तरी फरार दोन्ही आरोपी नगरसेवक असल्यामुळे हा विषय सध्या राजकीय बनला आहे. मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणात केलेली कामगिरी चांगली आहे; परंतु 15 दिवसांनतरही प्रमुख आरोपींना पकडता आले नाही त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरू आहे. लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tags : Solapur, Kluberme, Murder, Case, Major, accused, still, missing