होमपेज › Solapur › सोलापुरात शेतातील बांधाच्या वादातून वृद्धाची हत्या 

सोलापुरात शेतातील बांधाच्या वादातून वृद्धाची हत्या 

Published On: May 24 2018 3:05PM | Last Updated: May 24 2018 3:20PMमंगळवेढा (जि. सोलापूर) : प्रतिनिधी 

मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथे शेतामधील बांध पोखरल्याच्या कारणावरुन एका वृद्धाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. रतनसिंग गुलाबसिंग रजपूत (वय, ६५) असे हत्‍या झालेल्‍या वृद्धाचे नाव आहे. रतनसिंग रजपूत यांचा मुलगा हणमंत सिंग रजपूत (वय ३४)याने मंगळवेढा पोलिसात याबाबत तक्रार दिली आहे. त्‍यानुसार आरोपी रविंद्र बाबुसिंग रजपूत आणि राजकुमार महादेव रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मौजे सिद्धापूर शिवार येथील रहिवासी रतनसिंग रजपूत यांच्या मालकीची शेतजमीन आहे. ते शेतातील वस्तीवर असताना बुधवारी आठ वाजता शेतातील बांध पोखरल्याच्या कारणावरून आरोपी रविंद्र रजपूत आणि राजकुमार रजपूत यांनी रतनसिंग यांना शेतातील आंब्याच्या झाडाखाली नेले. त्या झाडाचे आंबे तोडून पिशवीत भरून ते मृत रतनसिंग यांच्या पिशवीत भरले. त्यानंतर आंबे तोडल्याचा आरोप करत रतनसिंग रजपुत यांच्या गुप्तांगावर, कमरेवर, छातीवर मुक्कामार देत त्यांचे दोन्ही हात पिरगळून त्यांना जबर मारहाण केली, या मारहाणीत त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शाहुराज दळवी या घटनेचा अधिक तपास करत आहेत.