Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Solapur › बार्शी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात

बार्शी परिसरातील खरीप हंगाम धोक्यात

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:43PMवैराग  : आनंदकुमार डुरे  

बार्शी तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला आहे. सुमारे चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके पावसाअभावी सुकू लागल्याने यंदाचा खरीप हंगाम धोक्यात सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच  चांगला पाऊस झाल्याने बार्शी तालुक्यात शेतकर्‍यांनी मोठ्या उत्साहाने पेरण्या केल्या. पेरणीनंतरही काही दिवस पाऊस पडल्याने पिकांची उगवण चांगली झाली. काही ठिकाणी पिके वाढू लागली, तर काही ठिकाणी पिके फुलोर्‍यात येऊ लागली असतानाच पावसाने दडी मारली. त्यामुळे हलक्या व माळरानावरची पिके सुकू लागली आहेत. पावसाचे प्रमाण सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी आनंदीत होऊन खते, बियाणे कर्जे काढून वेळप्रसंगी उधारीवर विकत घेतली. पण सुरुवातीला तोंड दाखवणारा पाऊस खरिपाच्या पेरणीनंतर गायब झाल्याने शेतकर्‍यांचा आनंद मावळून चिंतेत वाढ होऊ लागली आहे. लहरी पावसाचा फटका दुष्काळी बार्शी तालुक्याला बसू लागला असून यावर्षी खरिपाची पेरणी अडचणीत सापडली आहे. सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या सरींमुळे काही भागांतील शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. मात्र आता पाऊस लांबू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडू लागला आहे.

बार्शी तालुक्यात आतापर्यंत 263 टक्के खरिपाची पेरणी झाली आहे.तालुक्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र 30227 हेक्टर असून आतापर्यंत 62, 443 हेक्टर क्षेत्रावरती खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे असून सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 4693 हेक्टर असताना 31,033 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ मूगाचे सरासरी क्षेत्र 163 हेक्टर असताना 2800 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करण्यात आली आहे. उडीद 1892 हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात 9612 हेक्टर क्षेत्रावरती पेरणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कारळे, सूर्यफुल यांची पेरणी कोणीच केलेली नसून खरिपातून हद्दपार होत चालले आहे. भुईमूग, कापूस, तीळ अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे. पावसाळी वातावरण, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज आणि यावर्षी उन्हाळ्यात पडलेले कडक ऊन यामुळे यंदा पाऊस जोरदार पडेल, अशी आशा शेतकर्‍यांची होती. पण एनवेळी पावसाने हुलकावणी दिल्याने ज्यांनी घाई करून पेरले त्यांच्या शेतात कसेबसे कुठेतरी उगवले आहे, पण पावसाच्या ओढीने तेही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहेत.