Sun, Aug 25, 2019 19:13होमपेज › Solapur › वारीत पाकिट चोरी करणारी टोळी करकंब पोलिसांकडून जेरबंद

वारीत पाकिट चोरी करणारी टोळी करकंब पोलिसांकडून जेरबंद

Published On: Jul 21 2018 5:09PM | Last Updated: Jul 21 2018 5:09PMकरकंब : प्रतिनिधी 

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर (दि १९) रोजी पाकीट चोरी करताना एकास पकडण्यात आले होते, त्या टोळीतील इतर चोर  पंढरपूरला पाकीट चोरीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, वारींनिमित्त करकंब परिसरात बंदोबस्तास असलेले सपोनि उमेश धुमाळ  यांना हरियाना पासिंगच्या गाडी चालकाकडे चौकशी करताना संशय आल्याने त्यांनी गाडीसह सर्वांना ताब्यात घेतले असता, इतर दोन गाड्यातून ही काही पाकीट चोर सापडले.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आषाढ़ी यात्रेनिमित्त पंढरपुरच्या दिशेने सराईत पाकिट चोरी करणारी टोळी येत असल्याची माहिती मिळाल्यावरुन करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि उमेश धुमाळ यांनी टेंभुर्णी - पंढरपुर मार्गावर भोसे पाटी नजिक हरियाणामधील गाडीच्या चालकाकडे चौकशी केली. या चौकशीमध्ये त्याचे नाव व पोलिस अधिक्षक यांच्याकडील माहितीनुसार मिळालेल्या नावामध्ये साम्य आढळून आल्याने गाडीसह सर्वांना त्‍यांनी ताब्यात घेतले. 

या गाडीतील चार महिला व तीन पुरुष यांच्याकडे तुटलेल्या अवस्थेत सोन्याच्या साखळ्या,मोबाईल व रोख रक्कम व  पुढील काळात मोठी गर्दी होईल अशा मुख्य देवस्थानांचा नकाशा मिळाला आहे. या सात जणांवर मुंबई मध्य रेल्वे व पुणे रेल्वे स्टेशन येथील पोलिस ठाण्यात तेथील भागात पाकिट, साखळी व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

तर करकंब येथील बासुरी हॉटेल  येथे आणखी दोन संशयित हरियाना येथील गाड्या थांबल्या असल्याची माहिती करकंब पोलिसांना मिळाली. या गाड़ी मधील सात महिला व सात पुरुष यांच्याकडे चौकशी केली असता पंढरपुरातील आषाढी वारीतील गर्दीचा फायदा घेऊन पाकिटमारी करण्याच्या उद्देशाने निघाले असल्याचे समोर आले आहे. यामुळे पंढरपुर मधील वारीत पाकिट मारीच्या घटनामध्ये काही अंशी घट होणार आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि उमेश धुमाळ यांच्या पथकातील पोहेकॉ अमित माळुंजे, पोहेकॉ आदिनाथ रानगट, पोकॉ रमेश फुगे, पोकॉ सागर ताकभाते, पोना अरुण कोळवले, पोना संदीप गिरमकर, पोलिस मित्र अशोक भोसले, पोलिस पाटिल विशाल अमराळे यांनी केली आहे.