सोलापूर : प्रतिनिधी
राज्य व केंद्रातील भाजपचे सरकार भांडवलदारांचे कर्ज माफ करते. परंतु, कर्जबाजारी शेतकर्यांना कर्जमाफी देत नाही, अशी घणाघाती टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोलापुरात राज्य सरकार व केंद्र सरकारवर केली. सोलापूर जिल्हा दौर्यावर आले असता, शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. कवाडे म्हणाले, भाजप हे देशातील जनतेची सपशेल फसवणूक करत आहे. अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकार जनतेला आफूची गोळी देऊन नेहमी गुंगीत ठेवण्याचे काम करत आहे. भाजप भारतीय संविधान बदलून मनुस्मृती देशात लागू करण्याच्या मनःस्थितीत आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांनी प्रथम ऐक्य करावे. नंतर आम्ही या ऐक्याच्या सागरात सामील होऊ, अशी भूमिकाही प्रा. कवाडे यांनी स्पष्ट केली.
कार्यकारिणीतून पाच जणांची हकालपट्टी
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीतून बिभीषण लोंढे, अमोल घोडसे, राहुल शंखे, शांतिकुमार नागटिळक आदीसह पाच जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचा खुलासादेखील यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. याप्रसंगी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, राजाभाऊ इंगळे, अमित कांबळे, रमेश सरवदे, लौकिक इंगळे, कपिल बनसोडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.