Wed, Apr 24, 2019 21:36होमपेज › Solapur › बार्शीत बसमध्ये चढताना महिलेचे 1 लाखाचे दागिने लंपास

बार्शीत बसमध्ये चढताना महिलेचे 1 लाखाचे दागिने लंपास

Published On: Apr 29 2018 12:32AM | Last Updated: Apr 29 2018 12:15AMबार्शी :  तालुका प्रतिनिधी 

बसमध्ये चढताना महिलेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 8 हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बार्शी बसस्थानकावर घडली. शुभांगी शिरीष बावधनकर (वय 38, रा. दत्तनगर, बार्शी) यांनी याबाबत बार्शी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, बावधनकर या आपल्या आजारी वडिलांना पाहण्यासाठी मोहोळ येथे निघाल्या होत्या. पती शिरीष बावधनकर यांचे चारचाकी मोटार बॅटरी दुरुस्तीचे गॅरेज असल्याने दुपारी घरी कोणीच नसणार म्हणून शुभांगी यांनी घरातील  सोने मोहोळ येथे जाताना आपल्या पर्समध्ये ठेवले. घरामधून लवकर बाहेर पडल्यानंतर साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्या बार्शी बसस्थानकावर आल्या.

बार्शी बसस्थानकावर आल्यानंतर सकाळी 11.45 वाजता त्या बार्शी-मोहोळ या एस.टी. बसमध्ये बसल्या.दरम्यान, बस बाळेश्‍वर नाका येथील चौकात आल्यानंतर त्यांनी पर्सची पाहणी केली असता पर्समधील एक तोळे वजनाचे व 25 हजार रूपये किंमतीचे ब्रेसलेट, दीड तोळा वजनाचे व 45 हजार रूपये किंमतीचे नेकलेस, एक तोळा वजनाचे व 25 हजार रूपये किंमतीचे लॉकेट, 8 हजार रुपये किंमतीचे टॉप्स व रोख 5600 रूपये रक्कम नसल्याचे निदर्शनास आले.आपल्या पर्समधील दागिने चोरीस गेल्याची बाब बावधनकर यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बस वाहकास बस थांबवून बसमध्ये चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी बसस्थानकावर येऊन नंतर पोलिस ठाणे गाठले. दागिने चोरीची घटना सकाळी 11.45 वाजता घडूनही बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभर सुरू होती. बसमध्ये बसत असताना छोट्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकणी  अज्ञात चोरट्याविरूद्ध बार्शी पोलिसांत रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या विविध भागांत चोरीच्या घटनांमध्ये भरीव वाढ झाली आहे.  शहरातील जुन्या पोलिस ठाण्यासमोरून राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या गाडीची काच भरदिवसा फोडून मोठी रक्कम लंपास करूनही अद्याप याचा तपास पोलिस करू शकला नाहीत. काही दिवसांपूर्वी बार्शी शहर व तालुक्यातील विविध पोलिस अधिकार्‍यांची घरे फोडून लाखो रूपये लंपास करण्यात आले 
आहेत.

Tags : Jewellery, W Snatched, Women,  Barshi, Solapur