Wed, Jul 17, 2019 20:39होमपेज › Solapur › ज्वेलर्स दुकान फोडणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

ज्वेलर्स दुकान फोडणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Published On: Sep 13 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 11:03PMसोलापूर : प्रतिनिधी

ज्वेलर्स दुकान फोडणार्‍या आंतरजिल्हा टोळीस जेरबंद केले आहे. यामुळे राज्यातील विविध सहा गुन्हे उघडकीस आले असून 12 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी दिली.
पोलिस मुख्यालय येथे बुधवारी सायंकाळी 6 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

घडलेली घटना अशी की, 9 ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या मारूती सुझुकी एर्टीगा कारमधून येऊन गॅस कटरच्या सहायाने तौहिद ज्वेलर्स (किडवाई चौक, सोलापूर) फोडण्याचा प्रयत्न केला होता. हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिस आयुक्त यांनी गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. यावर गुन्हे शाखेने प्राप्त तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली. 11 सप्टेंबर रोजी पोउपनि खेडकर व त्यांच्या पथकाने गुन्ह्यातील संशयित आरोपी हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड परिसरात त्याच गाडीत मोबाईल विकताना पकडले. यावेळी संशयित श्रीकांत पंडित चव्हाण (वय 23, रा. आचार्य लमाण तांडा, मुरूम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), प्रवीण खेमू जाधव (वय 21, रा. सदर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ताब्यातील एर्टीगा कार, गॅसकटर, 2 गॅस टाक्या व 11 मोबाईल जप्त केले.  यातून अधिक तपास केला असता तानाजी शिवाजी जाधव (वय 22, रा. सदर), राजू उर्फ राजेंद्र रामा राठोड (वय 23, रा. सदर) यांच्या साथीने गॅसकटरच्या सहायाने तौहिद ज्वेलर्स फोडण्याचा आणि सरस्वती चौक सोलापूर येथील कॅनरा बँकेचे एटीएम, शिवाजी चौक, उमरगा येथील मोबाईल दुकान आणि उमरगाजवळील बलसूर येथे एसबीआय बँकेचे एटीएम गॅसकटरने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. तर एर्टीगा कार अंधेरी, मुंबई व इनोव्हा कार विलेपार्ले, मुंबई येथून चोरल्याचे कबूल केले. अशा सहा गुन्ह्यांतील एकूण 12 लाख 57 हजार 800 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या पत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पो. आयुक्त (गुन्हे) अभय डोंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (गुन्हे) सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.