Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Solapur › जलयुक्‍तमध्ये सोलापूरचा डंका

जलयुक्‍तमध्ये सोलापूरचा डंका

Published On: Jan 05 2018 1:29AM | Last Updated: Jan 04 2018 10:37PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जलयुक्त शिवार अभियानाचे राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण आज, गुरुवार मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. पहिल्याच वर्षीच्या पुरस्कारामध्ये सोलापूर जिल्हा, बार्शी तालुक्यातील मळेगाव आणि तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंंढे यांचा सर्वोत्कृष्ट कार्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात जलयुक्‍त पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण मंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव सुमित मलिक हे उपस्थित होते.

राज्यस्तरावरील प्रथम जिल्हा म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जलमित्र पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आला. 50 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. त्याचप्रमाणे राज्यस्तरावरील गावाला दिला जाणारा सर्वोच्च असा महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार मळेगाव या गावास प्रदान करण्यात आला. 25 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सरपंच गुणवंत मुंडे व ग्रामस्थांनी पुरस्कार स्वीकारला. याबरोबरच तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचाही राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी व पुणे विभागातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आले.