Sat, Sep 22, 2018 04:53



होमपेज › Solapur › जालन्यातील डॉक्टरच्या मुलाचे सोलापुरातून अपहरण

जालन्यातील डॉक्टरच्या मुलाचे सोलापुरातून अपहरण

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:49PM



सोलापूर : प्रतिनिधी

जालना येथील एका डॉक्टरच्या 16 वर्षीय मुलाचे सोलापुरातून अपहरण झाल्याची घटना गुरुवारी घडली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. राजेश सुरेश कुटे (वय 43, रा. शिवनगर, अंबडनाका, पोलिस चौकीपाठीमागे, जालना, सध्या रा. म्हाडा कॉलनी, सहयोगनगर, सोलापूर) असे फिर्याद दाखल केलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. 

डॉ. राजेश कुटे यांचा मुलगा त्यांच्या भावजीकडे शिकण्यास होता. तो जालना येथे सोलापूर येथून एसटीने जाणार होता. परंतु,   जालना येथील घरी तो पोहोचला नाही. त्याचे सोलापूर एसटी स्टँडवरून कोणी अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. 
फिर्यादीचे भावजी जगदीश गार्डी हे सोलापुरातील सहयोगनगरमध्ये राहतात. त्यांच्याकडे अपहरण झालेला मुलगा पहिलीपासून  शिक्षणास आहे. त्याने विजापूर रोडवरील शांती इंग्लिश मिडियम स्कूलमधून दहावीची परीक्षा दिली आहे. मुलाला दहावीत चांगले मार्क पडल्याने पुढचे शिक्षण दुसरीकडे घ्यावयाचे ठरवले.

 त्यानुसार जगदीश आणि मुलाने मार्कशीट, दाखला घेऊन जालन्याला येतो, असे कळविले होते. मात्र 14 जून रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी डॉ. राजेश कुटे यांना जालना येथील राहत्या घरी सोलापूरहून एक पीएसआय बोलत असल्याचा फोन आला. आपला मुलगा रात्री दोन वाजेपर्यंत उशिरा रस्त्याने फिरत असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत आणखी तीन मुले असल्याचे सांगितले.   आपलाच मुलगा असल्याची खात्री पटल्यानतंर डॉ. राजेश कुटे यांनी मुलास समज देऊन घरी पाठवून देण्यास सांगितले. मात्र सायंकाळचे चार वाजले तरी मुलगा घरी आला नसल्याचे भावजी जगदीश यांनी डॉ. कुटे यांना सांगितले. त्यांतर तातडीने डॉ. कुटे यांनी सोलापूर गाठले. मित्राकडे, आसपास चौकशी केली असता कोठेही मुलगा आढळून आला नाही. सगळीकडे शोध घेतल्यानंतर पोलिसांकडे धाव घेऊन पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 
डॉ. कुटे यांच्या मुलाची तक्रार बेपत्ता म्हणून दाखल आहे. त्यानुसार तपास चालू आहे. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. माहिती घेऊन सांगतो. 
- तुकाराम जमादार 
सहायक पोलिस निरीक्षक