होमपेज › Solapur › आंतरराज्य बँड-बाजा टोळीला सोलापुरात अटक 

आंतरराज्य बँड-बाजा टोळीला सोलापुरात अटक 

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:22PMसोलापूर  :  प्रतिनिधी

लग्नसमारंभावेळी मंगल कार्यालयात एखाद्या पाहुण्यांप्रमाणे येऊन सोन्याचा ऐवज व इतर किमती साहित्य लंपास करणारी आंतरराज्यीय बँड-बाजा टोळीतील गीताबाई जीतमल सिसोदिया (वय 37, रा. कडीयसासी राजगड, मध्य प्रदेश) या महिलेसह व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. ही बँड-बाजा टोळी राज्यभर सक्रिय असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. 20 फेब्रुवारी रोजी सुरेखा मेंगजी यांच्या मुलीचे लग्न होटगी रोडवरील हेरिटेज मंगल कार्यालयात होते. लग्न समारंभ संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास वधू विदाईवेळी सुरेखा मेंगजी यांनी आपल्याजवळील पर्स खाली ठेवून नातेवाइकांना नमस्कार करत असताना बँड-बाजा टोळीने पर्स लंपास केली.

त्यामध्ये चांदीचे जोडवे, सोन्याची कर्णफुले, रत्नजडीत हार व मोबाईल असा 1 लाख 8 हजार रुपयांचा ऐवज होता. याबाबतचा गुन्हा  सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लग्न समारंभातील सीसीटीव्ही फुटेज पाहता एका अनोळखी महिलेची हालचाल पाहून संशय व्यक्त केला. तपासाची चक्रे फिरवत बातमीदारामार्फत माहिती  मिळाली की एक महिला दोन लहान बालकांना घेऊन सात रस्ता येथील मंगल कार्यालयाजवळ फिरत आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्या महिलेला व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन सीसीटीव्ही फुटेज पाहून शहनिशा करत खात्री केली.

त्याची अधिक चौकशी केली असता ती बँड-बाजा टोळीतील संशयित आरोपी गीताबाई सिसोदिया हिला मध्य प्रदेश येथील आशिष नथुसिंग सिसोदिया याने सिफ्ट कारमधून दहा-बारा दिवसांपूर्वी सोलापुरात आणून सोडले असल्याची कबुली दिली तसेच फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नांदेड आदी जिल्ह्यांत लग्न समारंभात किंवा मंगल कार्यालयांत चोर्‍या केल्याची कबुली दिली. या बँड-बाजा टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.