Sun, Aug 25, 2019 08:46होमपेज › Solapur › इतिहास रचणार्‍या भाजपला अंतर्गत कलहाने कलंक

इतिहास रचणार्‍या भाजपला अंतर्गत कलहाने कलंक

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 11:35PM

बुकमार्क करा
सोलापूर ः  वेणुगोपाळ गाडी

सुमारे 50 वर्षे सोलापूर महापालिकेवर सत्ता उपभोगणार्‍या काँग्रेसला सन 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत पायउतार करून भारतीय जनता पक्षाने उत्तुंग कामगिरी करत  इतिहास रचला खरा, पण यशाच्या या उज्ज्वल कमानीला गटबाजीची काळी किनार लावून नेत्यांनी पक्षाच्या शिस्तबद्ध प्रतिमेला काळिमा फासला. दोन देशमुखांमधल्या वादांनी भाजपचे हे वर्ष गाजले. पक्षाच्या या दोन मातब्बर नेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर लक्ष देण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. त्यातून महापालिकेत परिवर्तनाचे पडसाद उमटू शकले नाहीत. उलट कॉँग्रेसच्या काळातील गटबाजीची सुधारित आवृत्ती भाजपच्या काळात पाहायला मिळत आहे.

पक्षाची ताकद मोठ्या  प्रमाणात वाढली
सोलापूर शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महापालिकेवर वर्षानुवर्षे काँग्रेसचीच सत्ता होती. अपवाद फक्त 1985 साली स्थापन झालेल्या पुरोगामी लोकशाही दलाच्या सत्तेचा. पुलोदचा दोन-तीन वर्षांचा कालखंड वगळता पुन्हा महापालिका काँग्रेसच्या ताब्यात राहिली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सोलापुरात भाजपचे अस्तित्व नगण्य होते. पण 1990 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघात भाजपने विजयाचा झेंडा रोवून नेत्रदीपक कामगिरीची चुणूक दाखविली. तद्नंतर या शहर-जिल्ह्यात या पक्षाची ताकद वाढतच गेली. 1996 साली लोकसभेची जागा पदरात पाडून या पक्षाने आपल्या वाढत चाललेल्या ताकदीची जाणीव करुन दिली.

जनतेला होत्या मोठ्या अपेक्षा, पण...
तत्कालीन भाजपचे खा. लिंगराज वल्याळ यांनी विधानपरिषद निवडणुकीत बहुमत असलेल्या काँग्रेसला पराभवाची धूळ चारुन सुभाष देशमुख यांना आमदार करण्याची किमया साधली. तद्नंतर सन 2003 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या सुभाषबापूंनी काँग्रेसला पराभूत करुन जोरदार धक्का दिला.

विधानसभा, लोकसभा  निवडणुकीत भाजपला अनेकदा यश आले; मात्र महापालिकेवर सत्ता आणण्यात यश येत नव्हते. अखेर सन 2014 मध्ये केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झालेल्या भाजपला मोठे बळ आले. याच जोरावर भाजपने फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवरुन पायउतार केले.  सत्तांतराच्या चमकदार कामगिरीनंतर भाजपकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र महापालिकेत सत्ता स्थापन करतानापासूनच या पक्षाला गटबाजीने ग्रासायला सुरुवात झाली. 

गटबाजीमध्ये  विकासकामे रखडली

या गटबाजीच्या राजकरणात बजेट तीन महिने लांबले. त्यानंतर बजेट कसेबसे झाले खरे, पण निधी नसल्याने विकासकामांना पैसा उपलब्ध होऊ शकला नाही. आर्थिक अडचणीचे कारण सांगत प्रशासनाने निधीला कात्री लावली. तद्नंतर एका आयोगाने आर्थिक कारणाचा संदर्भ देत मनपाला फटकारल्यामुळे नगरसेवकांनी सुचवलेली अनेक कामे प्रशासनाला रद्द करावी लागली. त्यामुळे या वर्षात विकासाची अपेक्षित कामे होणार नसल्याने नगरसेवक हैराण, तर जनता त्रस्त आहे. जनतेला ज्या अपेक्षा होत्या त्याची पूर्ती होऊ शकली नाही.  मनपातील भाजपला पालकमंत्री व सहकारमंत्री अशा दोन गटांच्या गटबाजीमुळे चांगेलच पोखरुन काढले. गाळे भाडेवाढ विषयावरुन या गटांची वेगवेगळ्या भूमिकेने पक्षाची अब्रू चव्हाट्यावर आली. यावर पक्षश्रेष्ठींनी समज देऊनही गटबाजी काही थांबली नाही. अगदी काही दिवसांपूर्वीच प्रभारी सभागृहनेतेपदावरुन गटबाजीचे प्रत्यंतर आले. सभा तहकूब ठेवण्याचा सपाटा सुरू असल्याने विषय मुदत संपल्याने प्रशासनाकडे चालले आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवरील निर्णय लांबत चालले आहेत. 

अंतर्गत वादाने पक्षाची प्रतिमा मलीन 

एकंदर गटबाजीमुळे भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे. लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे, तर दुसरीकडे विरोधकदेखील त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडत नसल्याने मनपा वार्‍यावर, तर जनतेचा कोणी वाली नाही, अशी विदारक स्थिती आहे. भाजपच्या निरंकुश,  मनमानी कारभारामुळे सन 2017 हे वर्ष ‘गाजले’ असे म्हणण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.