Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Solapur › इनफेक्शन मंथन

इनफेक्शन मंथन

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 9:22PMग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी, आरोग्य विभागातील असणार्‍या त्रुटी दूर करून या विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोचण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी कांही दिवसांपूर्वीच हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात आरोग्य मंथन कार्यक्रम आयोजित करून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना बुस्ट देण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न चांगला होता, मात्र कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व आरोग्य समितीच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. ही बाब किरकोळ असली तरी हाच विषय पुढे करुन जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी डॉ. राजेंंद्र भारुड व जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांची बोलती बंद केली आहे. मंथन कार्यक्रमात आरोग्याचा मंथन होण्याऐवजी इनफेक्शन मंथन झाल्याचेच चित्र दिसून येत आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील  व बेगानी शादी में अब्दुला दिवाना.. या उक्तीप्रमाणे या कार्यक्रमात जि.प. सदस्य उमेश पाटील हे दोघेच उपस्थित होते. त्यामुळे अन्य जि.प.सदस्य व पदाधिकार्‍यांत साहजिकच नाराजी वाढली गेली आहे. त्यामुळे डॉ. भारुड यांना याप्रकरणी इन्फेक्शन दूर करण्यासाठी अ‍ॅन्टी बायोटिक औषधे प्रशासनाला देण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचे करमाळा व माढा इतके दोनच विषय मर्यादित राहिले आहेत. त्यापलीकडे त्यांचे अन्य कोणत्याही बाबीकडे लक्ष दिसून येत नाही. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचे दिसून येते. त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार्‍या स्थायी व जलसंधारण सारख्या महत्त्वाच्या समिती सभा घेण्यासाठीही त्यांना वेळ नसल्याचे दिसून येते.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव व अन्य तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विरोधातही सदस्यांत रोष आहे. त्यामुळे हा रोष दूर करण्याचे कौशल्य डॉ. भारुड यांना दाखवून द्यावे लागणार आहे. तरच जिल्हा परिषदेच्या गाडीची दोन्ही चाके समतोल साधून चालतील. अध्यक्ष शिंदे यांनाही आता करमाळा व माढा हे दोन्ही तालुके बघून जिल्ह्यातील तमाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या हितासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा व पीक विमा जिल्हा परिषदेकडून राबवून शेतकर्‍यांना संकटकाळी मदत करण्याचा मानसही त्यांचा अजून अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या संकल्पसिध्दीवर मंथन करण्याची त्यांच्यावरही वेळ आली आहे. अन्यथा त्यांच्याही संकल्पसिध्दीची इन्फेक्शन सिध्दी होण्यास वेळ लागणार नाही. वरच्या पातळीवर डॉ. शीतलकुमार जाधव यांचे चांगले जुळते, मात्र खालच्या दुसर्‍या पातळीवर मात्र अजून त्यांचे जुळत नसल्याने, त्यांच्याविरोधात रोष पसरला गेला आहे. हा रोष कशा पध्दतीने दूर होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.