Tue, Apr 23, 2019 06:17होमपेज › Solapur › प्लास्टिकबंदीमुळे रद्दी खातेय ‘भाव’

प्लास्टिकबंदीमुळे रद्दी खातेय ‘भाव’

Published On: Jun 28 2018 1:36AM | Last Updated: Jun 27 2018 10:07PMबार्शी : गणेश गोडसे 

एखाद्या किरकोळ गोष्टीला कधी महत्त्व प्राप्‍त होईल, हे सध्या सांगता येत नाही. एरवी क्षुल्लक समजून रद्दी म्हणून गणली जाणारी वह्या, पाठ्यपुस्तके, वृत्तपत्रांची रद्दीही आता ‘भाव’ खात असल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र सरकारच्यावतीने 23 जूनपासून घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीमुळे बाजारपेठेतून प्लास्टिकच्या पिशव्या गायब झाल्या असून या बंदीमुळे मात्र वह्या, पुस्तकांच्या रद्दीबरोबरच वृत्तपत्रांच्या रद्दीलाही सुगीचे दिवस  आल्याचे चित्र शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही पहावयास मिळत आहे. 

कॅरीबॅग बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर कागदांची पार रद्दी होऊन गेली होती. परंतु आता कॅरीबॅगवरील बंदी व्यापार्‍यांना न पचणारी आहे असाच सूर ऐकावयास येत असला तरी सर्वसामान्य जनता व निसर्गप्रेमी मात्र या निर्णयाच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. कॅरीबॅग बंदीमुळे इंग्रजी वृत्तपत्रांच्या रद्दीबरोबरच मराठी वृत्तपत्रांच्या रद्दीसही ‘अच्छे दिन’ आलेले आहेत. इतरवेळी अगदी कवडीमोल दराने विकली जाणारी रद्दी ही सध्या चांगलाच भाव खाताना दिसून येत आहे. यापूर्वी फक्त सात रूपये किलोनेच जाणारी रद्दी पंधरा ते अठरा रूपयांपर्यंत पोहचली आहे.कॅरीबॅग बंदीमुळे गरजवंत लोक दैनंदिन पेपर घेणार्‍या कुटुंबाची घरे गाठून रद्दीची मागणी करताना दिसून येत आहेत. बाजारपेठेतून प्लास्टिक कॅरीबॅग हद्दपार झालेली असल्यामुळे आता ग्राहकही जागरूकता दाखवत म्हणा अथवा कारवाई टाळण्यासाठी म्हणा घरातून बाहेर पडताना कापडी तसेच नायलॉन पिशव्या हाती घेऊन निघत आहेत. 

व्यापार्‍यांकडून होतेय अंमलबजावणी 

राज्य सरकारच्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग बंदी निर्णयाचे व्यापारी वर्गात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मत प्रवाह दिसून आले असले तरी किराणा दुकानदार, स्वीट मार्ट विक्रेते आदींनीही कॅरीबॅगमधून साहित्य विक्री बंद केल्यामुळे या निर्णयाला बळकटी मिळताना दिसत आहे. व्यापारी तसेच दुकानदार, मटन मार्केटमध्येही कॅरीबॅगऐवजी चक्‍क रद्दी पेपरचा वापर होत असल्याचे दिसत आहे. 

मटनासाठी पूर्वीप्रमाणेच डब्याचा वापर केला जात आहे. तसेच दंडाचा भुर्दंड टाळण्यासाठी कापडी पिशवीचाही वापर वाढला आहे. विशेष बाब ही की, प्लास्टिक बंदीमुळे व्यापार्‍यांच्या व्यापारात वाढ झाली असून अनेक दुकानदार व व्यापार्‍यांनी दोन, पाच ते दहा, वीस रुपयांपर्यंत विकल्या जाणार्‍या पिशव्या विक्रीसाठी ठेवून त्यातून आपल्या दुकानातील साहित्य ग्राहकांना विक्री करत आहेत. त्यासाठी वेगळी रक्कम मोजावी लागत असल्याने ग्राहकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. दुकानात पुन्हा एकदा कागदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कॅरीबॅगमुळे दुकानामधून कागदी पुडी गायब झाली होती. दुकानातून विक्री होणार्‍या वस्तू प्लास्टिक पिशव्यांमधून दिल्या जात होत्या. सध्या प्लास्टिक वापरावर बंदी आल्याने कॅरीबॅगची जागा पुन्हा एकदा रद्दीने घेतली आहे.