Fri, May 24, 2019 02:40होमपेज › Solapur › अवयवदानाच्या वृत्तीमुळे माणुसकी वाढीस

अवयवदानाच्या वृत्तीमुळे माणुसकी वाढीस

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:15PMसोलापूर ः प्रतिनिधी

महापालिका आयुक्‍तांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर हे  मेंदूमृत झाल्याने यांच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले. अश्‍विनी रुग्णालयातर्फे झालेल्या ग्रीन कॉरिडॉरद्वारे सह्याद्री रुग्णालय, पुणे येथे एक लिव्हर, एक किडनी पाठवण्यात आली. उर्वरित एका किडनीचे अश्‍विनी रुग्णालयातील महिला रुग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. दोन डोळे प्रत्यारोपणासाठी सोलापूर येथील तोष्णीवाल रक्‍तपेढीस देण्यात आले. अवयवदानाच्या वाढत्या वृत्तीमुळे समाजात माणुसकी वाढीस लागत आहे.

तीन दिवसांपूर्वी विजापूर रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले सुनील क्षीरसागर (वय 54, रा. द्वारकानगरी, विजापूर रोड) यांचे ब्रेनडेड झाल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबतची शेवटची एक महत्त्वाची चाचणी सोमवारी रात्री दहा वाजता करण्यात आली. त्यानंतर क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाबाबत समुपदेशन करण्यात आले.  क्षीरसागर हे सोलापूर महापालिका आयुक्‍तांचे स्वीय्य सहायक म्हणून काम पाहात होते. अश्‍विनी रुग्णालयातर्फे मंगळवारी अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 4 अवयवांचे दान करण्यात आले. सह्याद्री रुग्णालय, पुणे येथे अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे एक लिव्हर व एक किडनी पाठवण्यात आली. उर्वरित एका किडनीचे अश्‍विनी रुग्णालयातील महिला रुग्णास प्रत्यारोपण करण्यात आले. दोन डोळे प्रत्यारोपणासाठी सोलापूर येथील तोष्णीवाल रक्‍तपेढीस देण्यात आले. 

मुलाने फोडला हंबरडा

वडिलांचे अवयव पेटीतून नेत असल्याचे पाहून सुनील क्षीरसागर यांचा मुलगा सौरभ याने हंबरडा फोडला. ‘बाबा.. आम्हाला सोडून कसे निघाला हो...’, असा त्याने आक्रोश केला. क्षीरसागर यांचे अवघे कुटुंबीय यावेळी ओक्साबोक्सी रडत होते. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. क्षीरसागर यांच्या मित्रांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

100 जणांचे वैद्यकीय पथक

अवयवदानाची प्रक्रिया मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया सकाळी साडेदहा वाजेपर्यंत चालली. यामध्ये सह्याद्री रुग्णालयाचे एक पथक तसेच अश्‍विनी रुग्णालयाचे पथक सहभागी झाले होते. भूलतज्ज्ञ, किडनी तज्ज्ञ, अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सहायक असे 100 कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. 
त्यामध्ये अश्‍विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली, डॉ. किरण जोशी, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. विद्यानंद चव्हाण, डॉ. अनुराधा कारंडे, डॉ. वैशाली दबडे, डॉ. संतोष कलशेट्टी, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. शंतनू गुंजोटीकर आदी वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश होता.

पोलिसांचा चोख बंदोबस्त

या प्रक्रियेसाठी राबविण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरमध्ये पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका निभावली. शहर वाहतूक शाखेनेपोलिसांनी पुण्याकडे जाणार्‍या सह्याद्री रुग्णालयाच्या अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून दिली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती. पोलिसांनी सोलापूर-पुणे महामार्गावर सावळेश्‍वर टोलनाक्यापर्यंत बंदोबस्त पुरविला. तेथून पुढे पुण्यापर्यंत पोलिसांची एक गाडी पाठविण्यात आली.   

कुटुंबियांचे सांत्वन

क्षीरसागर यांचा मेंदू मृत झाल्याचे निष्पन्न होताच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, प्रत्यारोपण समन्वयक, व्यवस्थापनाने अवयवदानासाठी क्षीरसागर यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले. दुःखात असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानास संमती दिली. पुण्यातील झोनल ट्रान्सप्लांट समन्वय समितीने मंजुरी दिल्यानंतर अवयवदानाची रितसर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार ही ग्रीन कॉरिडॉरची मोहीम राबविण्यात आली़  यावेळी क्षीरसागर यांचा मुलगा सौरभ क्षीरसागर, मेव्हणे गिरीश माळवदकर, बाळकृष्ण करवे, मोठे बंधू अशोक क्षीरसागर यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. 

सोलापुरातील दहावी घटना

अवयवदानाची ही सोलापुरातील दहावी घटना आहे. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, यशोधरा रुग्णालय, अश्‍विनी रुग्णालयात नऊवेळा ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. मंगळवारची  अवयव प्रत्यारोपणाची शहरातील दहावी  तर अश्‍विनीतील दुसरी घटना असल्याची माहिती अश्‍विनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली.