Tue, Mar 19, 2019 11:24होमपेज › Solapur › मंगळवेढा शहर व तालुक्यात छेडछाडीच्या प्रकरणात वाढ

मंगळवेढा शहर व तालुक्यात छेडछाडीच्या प्रकरणात वाढ

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:24PMमंगळवेढा :  तालुका प्रतिनिधी 

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात छेडछाडीचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत असून गेल्या दोन महिन्यात जवळपास 150 तक्रारी निर्भया पथकाकडे प्राप्त झाल्या आहेत. संबंधितांच्या पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पोलिसांकडून साध्या वेशात गस्त घालण्याचे कामही सुरू आहे. 

मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात जुन महिन्यात 80 व जुलै महिन्यात 70 अशा आत्तापर्यंत 150 छेडछाडीची प्रकरणे निर्भया पथकाकडे प्राप्त झाली. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वासराव नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी यांनी सदर तक्रारीतील मुलांच्या पालकांना बोलावून समुपदेशन करण्यात आले. 

छेडछाडीचे प्रमाण रोखण्यासाठी मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी कॉलेज, माचणूर येथील श्री सिध्देश्‍वर प्रशाला, मरवडे येथील हनुमान विद्यामंदिर, येड्राव येथील पाटील विद्यालय, नंदेश्‍वर येथील बाळकृष्ण विद्यालय येथे मुला-मुलींची मार्गदर्शनपर शिबिरे घेण्यात आली. 

छेडछाड होत असल्यास मुलींनी थेट नियंत्रण कक्ष व हेल्पलाईनवरून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन करण्यात आले. मंगळवेढा शहरातील बसस्थानक, कॉलेज मार्ग, आठवडी बाजार, शाळाबाह्य व शाळेतील विद्यार्थ्यांवर निर्भया पथक करडी नजर ठेवून आहे. रोडरोमिओंना अटकाव करण्यासाठी निर्भयाचे पथक हे सिव्हील ड्रेसवर शहरातून गस्त घालत आहे. 

यामध्ये एक अधिकारी, एक महिला पोलिस व एक पुरूष पोलिस यांचा समावेश आहे. मोटार सायकलवर ट्रिपलशीट फिरणारे, गाडीच्या पुंगळ्या काढून आवाज करणारे रोडरोमिओंवरही हे पथक कारवाई करीत आहे.