Mon, May 20, 2019 18:43होमपेज › Solapur › एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ त्वरित द्या

एसटी कर्मचार्‍यांना वेतनवाढ त्वरित द्या

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:29PMसोलापूर ः प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांना 15 जून रोजी जाहीर झालेली 104/18  प्रमाणे वेतनवाढ त्वरित देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी  करु लागले आहेत.त्यामुळे   एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपाचा एल्गार पुकारण्याच्या भूमिकेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यभरातील 1148 एसटी कार्मचार्‍यांची बडतर्फी व 200 एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे व 104/18 प्रमाणे त्वरित वेतनवाढ द्यावी अशा  प्रमुख दोन मागण्या घेत एसटी कर्मचारी संघटना व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत सोमवार, 25 जून रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती संघटनेच्या सुनील शिंदे, हणुमंत ताटे, संतोष जोशी आदी पदाधिकार्‍यांनी दिली.

8 व 9 जून रोजी वेतनवाढीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी राज्यभर अघोषित संप पुकारला होता. अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. अचानक झालेल्या संपामुळे परिवहनमंत्री रावते, व्यवस्थापकीय संचालक व एसटी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक घेऊन वेतनवाढीची घोषणा झाली होती.

अचानक पुकारलेल्या संपाचा अहवाल मागवून व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यभरातील 1148 एसटी कर्मचार्‍यांची  सेवा  समाप्त केली आहे व 200 कर्मचार्‍यांना निलंबित केले आहे. त्याविरोधात एसटी कर्मचारी संघटना एल्गार पुकारण्याच्या भूमिकेत आहेत तसेच 15 जून रोजी जाहीर झालेली 104/18 प्रमाणे वेतनवाढ त्वरित द्यावी, अशी मागणी केली जात आहे. या बैठकीत आता ठोस उपायोजना व्हावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. कर्मचार्‍यांचा भवितव्याचा विचार व्हावा, असाही मतप्रवाह  आहे. मुंबईत होणार्‍या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. बैठकीत तोडगा न निघाल्यास लालपरीचा पुन्हा एकदा संप होईल, अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.