Sun, Jul 21, 2019 16:45
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › पुरस्काराची उंची वाढवा

पुरस्काराची उंची वाढवा

Published On: Aug 26 2018 10:29PM | Last Updated: Aug 26 2018 9:50PMशिक्षक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकास त्याने केलेल्या विशेष उपक्रमाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना देण्यात येणारा पुरस्कार हा अत्यंत मानाचा समजण्यात येतो. या पुरस्कारामुळे भावी पिढी घडविणार्‍या शिक्षकांना प्रेरणा मिळते. जिल्हा परिषदेकडून मिळणारा पुरस्कार हा मानाचा असल्याने अलीकडे कांही वर्षात या पुरस्कारासाठी वशिलेबाजी सुरु झाली आहे. पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी शिक्षक कम शिक्षक नेते चक्‍क लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याचे दिसून येत आहे. 

राजकीय लोकप्रतिनिधींना  निवडणुकीच्या  काळात शिक्षकांच्या सहकार्यावर अवलंबून रहावे लागते हे उघड गुपीत आहे. त्यामुळे जि.प.पदाधिकारीही पुरस्कार मिळावा म्हणून आपल्या दारात आलेल्या शिक्षकांची नावे प्रशासनाकडे सादर करीत आहेत. मात्र हा प्रकार जि.प.पदाधिकार्‍यांना पटत नसतानाही, केवळ राजकीय गोळाबेरीज करण्यासाठी त्यांच्याकडून पुरस्कारासाठी येणारे प्रस्ताव दाखल करुन घेण्याची वेळ आली आहे. जि.प.अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षण समितीचे सभापती शिवानंद पाटील यांनी खरेच चांगले काम असणार्‍या शिक्षकांना पुरस्कार मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे याबाबत पुरस्कारासाठी नाव निवडण्याचे संपूर्ण अधिकार त्यांनी पुरस्कार निवड समितीच्या कार्यकारिणी सदस्यांना दिला आहे. 

जि.प. प्राथमिक शाळेत गुणवत्तावाढीसाठी अनेक शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचा लौकिक वाढला आहे ही वस्तुस्थिती आहे. असे उपक्रम करणार्‍या शिक्षकांची संख्या हजारावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यंत बारीक  चाळणीत चाळणी घालून ग्रामीण भागातील उपेक्षित व वंचित मुलांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्‍या शिक्षकांची निवड यासाठी करावे लागणार आहे. यासाठी जि.प.प्राथमिक शिक्षण विभागाचे कौशल्य पणास लागणार आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनीही चांगले काम करणार्‍या शिक्षकांनाच पुरस्कार मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. 

त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अट्टाहास करणार्‍या शिक्षकांनी वेळीच सावध होऊन, आपल्यापेक्षा चांगले काम असलेल्या आपलाच बंधू शिक्षकासाठी पुरस्कारासाठी वाट मोकळी करण्याची गरज निर्माण झाली आहे. जि.प.आदर्श शिक्षक पुरस्काराची उंची खर्‍या अर्थाने वाढविण्यासाठी सर्वच जि.प. प्राथमिक शिक्षकांची सकारात्मकता गरजेचे आहे.