होमपेज › Solapur › आवक घटल्याने डाळिंब दरात वाढ

आवक घटल्याने डाळिंब दरात वाढ

Published On: Feb 11 2018 10:40PM | Last Updated: Feb 11 2018 8:44PMपंढरपूर : प्रतिनिधी

गेल्या वर्षभरापासून डाळिंबाचे दर गडगडले होते, मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून डाळिंबाची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे. गणेश, भगवा, आरक्ता डाळिंबाला चांगली मागणी होत आहे. लिलावात 30 ते 110 रुपये प्रतिकिलो डाळिंब विक्री होत आहे तर जागेवरही व्यापार्‍यांकडून 70 ते 75 रुपये दर दिला जात आहे. त्यामूळे डाळिंब उत्पादकांतून काही अंशी समाधान व्यक्त केले जात आहे.

वर्षभरापासून डाळिंबाला कवडीमोल दर दिला जात असल्याने शेतकर्‍यांचा औषध पाण्याचा खर्च देखील निघत नव्हता. यातच तेल्या, मररोग, खराब हवामान यामूळे डाळिंबाचे मोठे नुकसान होत होते. त्यामुळे वैतागून शेतकर्‍यांनी डाळींबाच्या बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. जुन्या बागा काढून टाकल्याने डाळिंबाची होणारी आवक घटली आहे. त्यामूळे सध्या बाजारात व्यापारी डाळिंबाच्या प्रतीक्षेत आहेत.

प्रतिकिलो 40 ते 50 रुपये दरम्यान राहणार दर या महिन्यात प्रथमच शंभर रुपयांच्यावर गेला आहे. हंगाम संपत आल्याने आणखी दर वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून वर्तवली जात आहे.पंढरपूर येथील बाजार समितीत गणेश डाळिंबाला 20 ते 50  रुपये तर भगवा डाळिंबाला 35 ते 110 रुपये दर मिळाला आहे. दरवाढ होऊ लागल्यामुळे दराची प्रतीक्षा लावून बसलेल्या शेतकर्‍यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जागेवरही व्यापार्‍यांकडून चांगला दर देवून डाळिंब खरेदी केले जात आहे.गणेश डाळिंब 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दर दिला जात आहे. तर भगवा डाळिंबाला  70 ते 75 रुपये दराने खरेदी केले जात आहे.

चंद्रकांत जाधव, डाळिंब व्यापारी
गणेश, भगवा डाळिंबाला चांगल्या प्रतिच्या मालाला चांगला दर दिला जात आहे. भगवा डाळिंब 70 ते 75 रुपये दराने तर गणेश डाळिंब 30 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने जागेवर खरेदी केले जात आहे.शेतकर्‍यांना काटा पेमेंट दिले जात आहे.

भास्कर कसगावडे, डाळिंब आडत व्यापारी
बाजारात डाळिंबाची आवक कमी होऊ लागली असल्याने डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. 40 रुपयांपासून 110 रुपये किलोपर्यंत दर दिला जात आहे. आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.