होमपेज › Solapur › डॉ. आंबेडकरांचे विचारच उद्धार करू शकतात : चरणसिंग टाक 

डॉ. आंबेडकरांचे विचारच उद्धार करू शकतात : चरणसिंग टाक 

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 14 2018 9:04PMसोलापूर : प्रतिनिधी

गटातटांत विभागलेले नेते आणि 33 कोटी देव तुमचा उद्धार करू शकत नाहीत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, तेच तुमचा उध्दार करू शकतात, असे प्रतिपादन सफाई कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते या संमेलनाचे उद्घाटक होते. यावेळी संमेलनाध्यक्ष तथा समता सैनिक दल, नागपूरचे राष्ट्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर, राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे, दादाराव लहाने, दत्ता गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, सुबोध वाघमोडे, डॉ. औदुंबर मस्के, प्रा. एम. आर. कांबळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी चरणसिंग टाक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. उपस्थितांच्या हस्ते महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

चरणसिंग टाक पुढे म्हणाले की, मार्क्सवादी दुसर्‍या देशातून येथे आले आणि त्यांनी इथले अनेक उद्योग बंद पाडले. त्यांना आपण हद्दपार केले पाहिजे. यापुढे आपल्या विकासाचा जे विचार करतील त्यांचाच आपण विचार करू. आपल्यातील बरेच नेतेमंडळी गटातटांत विभागली गेली आहे. त्यांचा फायदा समाजाला होत नाही. त्यांनी समाजाचा विचार करावा.

संमेलनाध्यक्ष विमलसूर्य चिमणकर म्हणाले, सोलापुरात जे विचार संमेलन होत आहे ते यापूर्वी कधीच झाले नाही. यापुढे विचार आत्मसात करा. लायक अनुयायी मिळाले नाहीत तर विचार मरून जातात. तसेच आपली धम्म चळवळ कुठे चालली आहे, याचा विचार करा. नागपुरात आपण व्यासपीठावर राजकीय नेते बोलवतो. ज्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी धम्मक्रांती केली, ज्यांनी गावाबाहेरच्या लोकांना गावात आणले त्या बाबासाहेबांचे विचार आचरणात आणा. यासाठी आंबेडकरवादाचा अभ्यास करावा लागेल. असे झाले तरच या देशातून मार्क्सवाद संपवता येईल. संमेलनाचे सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले. आभार प्रशांत गायकवाड यांनी मानले.

वाल्मिकी समाजात आंबेडकरी विचारांचा प्रसार

यापूर्वी वाल्मिकी समाजाकडे सर्वांनी दुर्लक्ष केले आहे. वाल्मिकी समाजाचा समुदाय 20 राज्यांत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्या त्याठिकाणी जाऊन आम्ही ‘जय भीम’चा नारा देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पसरवत असल्याचे उद्घाटक चरणसिंग टाक यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.