Thu, Apr 25, 2019 03:26होमपेज › Solapur › पंढरीत चौकी अंधारात आणि पोलिस रस्त्यावर

पंढरीत चौकी अंधारात आणि पोलिस रस्त्यावर

Published On: Jul 19 2018 1:40AM | Last Updated: Jul 18 2018 8:38PMपंढरपूर : प्रतिनिधी

आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी राज्यभरातून 4 हजारांवर पोलिस पंढरीत दाखल झालेले आहेत. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था, वाहतूक कोंडी टाळणे, भाविकांची सुरक्षितता या कामासाठी आलेल्या पोलिसांनाच असुरक्षितता भेडसावत आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि अत्यंतिक गर्दीच्या ठिकाणी असलेली पोलिस चौकी विजेअभावी अंधारात आणि पोलिस रस्त्यावर उभा असल्याचे दिसत आहे. 

येथील क्रांतीसिंह नाना पाटील चौकात पोलिस चौकी आहे. या चौकीवर पालखी मार्गावरून येणार्‍या लाखो भाविकांची गर्दी नियंत्रीत करणे, हजारो वाहनांची कोंडी टाळणे, या परिसरातील पोलिस कर्मचार्‍यांशी संपर्क साधणे आदी कामे  या पोलिस चौकीतून चालत असतात. एरव्ही ही पोलिस चौकी बंद असते आणि वर्षातील चार प्रमुख यात्रांकाळातच तिचा वापर केला जातो. 

यावर्षी पोलिस चौकीचा वापर सुरू केला असला तरी चौकीत वीजपुरवठा नसल्यामुळे ती संपूर्ण चौकी अंधारात आहे. त्यामुळे येथे नियुक्‍त केलेले पोलिस कर्मचारी अंधारात बसण्यापेक्षा रस्त्यावरील उजेडात येऊन उभा राहत आहेत. ऐन यात्रेच्या काळात पोलिस चौकीच अंधारात असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. 

यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यातील अधिकृत सूत्रांकडे चौकशी केली असता वीज बिल आले नसल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर चौकीतील हॅलोजन बल्ब बंद पडल्याचे सांगितले गेले. यात्रेची तयारी पोलिस प्रशासन गेल्या महिन्याभरापासून करीत असताना अशा प्रकारे पोलिस चौक्याच अंधारात राहणार असतील तर पोलिस बंदोबस्त किती सतर्क असेल अशी विचारणा भाविकांतून होत आहे.