Sat, Sep 22, 2018 01:23होमपेज › Solapur › राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी  टेंभुर्णीचा सूरज शिंदे ताब्यात

राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी  टेंभुर्णीचा सूरज शिंदे ताब्यात

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:30PMबेंबळे ः वार्ताहर

भीमा-कोरेगावमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर राहुल फटांगडे नावाच्या तरुणाची दंगेखोरांनी हत्या केली होती. यातील दोन आरोपी पुणे पोलिसांना सापडत नसल्याने त्यांनी व्हिडीओच्या आधारे फोटोग्राफ मिळवून ते राज्यभर प्रसिद्ध केले होते. या फोटोच्या आधारे टेंभुर्णीतील सूरज शिंदे यास ताब्यात घेण्यात आले आहे. 

1 जानेवारी रोजी शौर्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर भीमा-कोरेगाव येथे लाखो नागरिक अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी या भागात दंगल भडकली असताना पेरणे फाटा येथील पेट्रोलपंपापासून काही अंतरावर राहुल बाबाजी फटांगडे (वय 30, रा. कान्हून मसाई, ता. शिरूर) याला जमावाने अडवून दांडक्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातल्याने त्याचा मृत्यू झाला होता. हे पोलिस तपासामध्ये यापूर्वी समोर आले आहे.

राहुल फटांगडेच्या खूनप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक केली आहे. यातील दोघे जण अहमदनगरचे आहेत, तर एक जण औरंगाबाद येथील आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. फटांगडेच्या खून प्रकरणात आणखी चौघांचा सहभाग आहे. त्यांची नावे, माहिती सीआयडीला देणार्‍याचे नाव गुप्त ठेवून त्यास योग्य बक्षीसही दिले जाईल, असे सीआयडीच्या पुणे विभागाचे पोलिस अधीक्षक प्रसाद अक्‍कानवरू यांनी जाहीर केले.