Mon, May 20, 2019 20:37होमपेज › Solapur › बस स्थानकात ६६ हजारांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस

बस स्थानकात ६६ हजारांच्या चोरीचा गुन्हा उघडकीस

Published On: Aug 08 2018 8:11PM | Last Updated: Aug 08 2018 8:11PMमोहोळ : वार्ताहर 

मोहोळ बसस्थानकात प्रवाशांच्या पैशाची चोरी करणाऱ्या तीन महिलांना मोहोळ पोलीसांनी सोमवारी रंगेहात पकडले होते. त्यांपैकी दोघींनी ०२ जुलै रोजी मोहोळ बस स्थानकातून प्रवाशी महिलेच्या ६६ हजारांची चोरी केल्याची कबूली दिली. सुषमा बापू चव्हाण (रा. मुळेगाव, सोलापूर), मिनाक्षी प्रेमनाथ चव्हाण (रा. मानमुड ता. तुळजापूर) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्या दोघींना ०९ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैराग ता. बार्शी येथील राजश्री अरुण मोटे या ०२ जुलै रोजी एस.टी बसने बहिणी सह वैरागाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी एस.टी बसमध्ये बसत असताना त्यांच्या पैशाची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

०६ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलिसांनी मोहोळ बसस्थानकात चोरी करताना तीन महिलांना रंगेहात पकडले होते. यावेळी पोलिसांनी ०२ जुलै रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेबाबत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली. त्यावेळी सुषमा बापू चव्हाण (रा. मुळेगाव, सोलापूर), मिनाक्षी प्रेमनाथ चव्हाण (रा. मानमुड ता. तुळजापूर) या दोघींनी ०२ जुलै रोजी मोहोळ-वैराग बस मध्ये एका महिलेचे ६६ हजार रुपयांची चोरी केल्याची कबूली दिली. त्यामुळे आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.

मोहोळ पोलिसांनी बुधवारी आरोपी महिलांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने दोघींनाही ०९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपी महिलांकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे प्रवाशी वर्गातून पोलिसांच्या कामगिरी बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. 

पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विक्रांत बोधे, पो.हेड.कॉ. संजय जाधव, म.पो.ना. किर्ती धोत्रे, पो.कॉ. शितलकुमार गायकवाड, म.पो.कॉ. स्वाती अंबुरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला आहे. त्यामुळे नुतन पोलीस अधिक्षक मनोज पाटील, पोलिस उपअधिक्षक चंद्रकांत खांडवी, यांनी मोहोळ पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.