होमपेज › Solapur › करमाळा बाजार समिती त्रिशंकू; सत्तेच्या चाव्या संजय शिंदे गटाकडे

करमाळा बाजार समिती त्रिशंकू; सत्तेच्या चाव्या संजय शिंदे गटाकडे

Published On: Sep 11 2018 4:28PM | Last Updated: Sep 11 2018 10:09PMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीत राजकीय तज्ज्ञांच्या मते अनपेक्षित निकाल लागल्याने सत्तांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निवडणूक निकाल त्रिशंकू लागले असून, 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव जगताप व आमदार नारायण पाटील गटाच्या युतीला सहा जागी विजय मिळवता आला. यापूर्वीच व्यापारी मतदारसंघातील त्यांच्या दोन जागा अविरोध निवडून आल्या होत्या. 

त्यामुळे आता त्यांच्या गटाकडे आठ जागा झाल्या आहेत. मात्र, जयवंतराव जगताप हे वांगी व केम अशा दोन जागी निवडून आल्याने एक जागाच गृहित धरली जाणार आहे. बागल गटाने मात्र या निवडणुकीत जबरदस्त यश संपादन केले असून, पहिल्यांदाच स्वबळावर आठ जागा जिंकल्या आहेत. तर संजय शिंदे गटाने एका जागी यश संपादन करून बाजार समितीच्या कारभारात चंचुप्रवेश केला आहे. सत्तेच्या चाव्या शिंदे गटाकडे गेल्या असून, त्यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात मंगळवारी मतमोजणी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मारुती बोरकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर व सहायक निबंधक गावडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता 30 टेबलांवर मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या फेरीपासूनच चुरस दिसत असल्याने 15 ही जागेचे निकाल उशिरा घोषित करण्यात आले. करमाळा बाजार समिती निवडणुकीतील 15 जागांवर निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे- 

बागल गट - 8 जागांवर विजयी झालेले गण व उमेदवार : जातेगाव गण : संतोष वारे  1981 मते (विजयी), सुजितकुमार बागल 1797 (पराभूत), कंदर गण : रंगनाथ शिंदे 1572 (विजयी), दादासाहेब पाटील 1308 (पराभूत), नवनाथ भांगे 1277 (पराभूत), हिसरे गण : चिंतामणी जगताप 1561 (विजयी), गोरख लावंड 1357 (पराभूत), रावगावं सरस्वती केकाण 1190 (विजयी), कल्पना जाधव 1060 (पराभूत), सुनंदा रोडगे 276 (पराभूत), वीट गण : आनंदकुमार ढेरे 1251 (विजयी), हनुमंत ढेरे 1251 (पराभूत), हेमंत आवटे 745 (पराभूत), सावडी गणात अमोल झाकणे 1072 (विजयी), सतीश शेळके 808 (पराभूत), शहाजी धुमाळ 698 (पराभूत), राजूरी गण :   सुभाष गुळवे 1531 (विजयी), बापुसाहेब पाटील 1122 (पराभूत), हनुमंत पाटील 582 (पराभूत), पोथरे गण : दिग्विजय बागल 1687  (विजयी), सुनील सावंत 1382 (पराभूत), शंभूराजे जगताप 1225 (पराभूत).

पाटील-जगताप गट युतीचे : 6 जागांवर विजयी झालेले गण व उमेदवार : वांगी गण : जयवंतराव जगताप 1810 (विजयी), गणेश तळेकर 1332 ( पराभूत), केम गण : जयवंतराव जगताप 1192 (विजयी), महावीर तळेकर 1090 (पराभूत), गोरख तळेकर 880 (पराभूत), झरे गण : प्रा. शिवाजीराव बंडगर 1456 (विजयी), गणेश वैद्य 1174 (पराभूत), भगवान गिरी गोसावी 841 (पराभूत), जिंती गण : औदुंबर मोरे 1128 (विजयी), साहेबराव शिंदे 1073 (पराभूत), संभाजी शिंदे 470 (पराभूत), साडे गण : सदाशिव पांडुरंग पाटील 1548 (विजयी), दत्ता जाधव 1266 (पराभूत), नवनाथ बदर 803 (पराभूत), उमरड गण : शैला लबडे 1538 (विजयी), अलका पोळ 1525 (पराभूत), शोभा बदे 701 (पराभूत). संजय शिंदे गटाचा एका जागेवर विजयी झालेला गण व उमेदवार : वाशिंबे गण, चंद्रकांत सरडे 1422 (विजयी),  राजू झोळ 1238 (पराभूत), दत्ता सरडे 1129 (पराभूत).

व्यापारी मतदारसंघातील अविरोध उमेदवार विजय गुगळे व मयुर दोशी. हे दोन्ही उमेदवार जगताप गटाचे समर्थक आहेत. हमाल तोलार मतदारसंघातील अविरोध उमेदवार वालचंद रोडगे हे असून ते कै.सुभाष आण्णा सावंत गटाचे समर्थक आहेत.  उमरड गणात 13 मतांनी विजयी झालेले शैला लबडे यांच्या विजयाला हरकत घेऊन फेरमतमोजणी घेण्यात आली. फेरमतमोजणीत शैला लबडे या पुन्हा 13 मताने विजयी झाल्या. तर वीट गणातील देवळाली मतदान केंद्रातील मतपेटीत गणनेपेक्षा 50 मतपत्रिका जास्त आढळून आल्याने थोडावेळ मतमोजणी थांबवण्यात आली. नंतर पुन्हा मतमोजणी सुरू करून 90 मताने आनंदकुमार ढेरे हे निवडून आले.